शहर व तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांत असंतोष खदखदू लागला आहे
तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने कमालीचा संताप व्यक्त केल्या जात आहे. खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकीस्वार पडून जख्मी झाले आहेत. तालुक्यातील रस्त्यांबरोबरच शहरातील रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. कित्येक दिवसांपासून रस्त्यांवरील खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतांनाही संबंधित विभाग खड्डे बुजविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शहर व तालुक्यातील मुख्य मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून काही रस्त्यांना तर पांदण रस्त्याचे स्वरूप आले आहे. रस्त्यांची झालेली अवस्था बघता खड्डेमय रस्त्यांचा तालुका म्हणून वणी तालुक्याची ओळख निर्माण होतांना दिसत आहे. काही रस्त्यांचे दुरुस्तीकरणाचे काम हाती घेतले असले तरी अत्यंत संथ गतीने काम सुरु असल्याने रस्त्यांचे काम पूर्ण होण्यास काळ लोटतो की, काय असे वाटू लागले आहे. काही रस्ते तर अद्यापही दुर्लक्षितच आहेत. दोन जिल्ह्यांच्यामध्ये अडकलेल्या वणी तालुक्याला खनिज निधीही विभागून मिळत असल्याने तालुक्याच्या विकासाची दैना झाली आहे. प्राथमिक सोयी सुविधांपासूनही वणी तालुका दुर्लक्षित राहिला आहे.
तालुक्यातील चारगावचौकी ते शिरपूर, शिरपूर ते शिंदोला या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता पूर्णतः उखडला असतानाच ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुरूम मतींनी काही खड्डे बुजविण्याचा बांधकाम विभागाने दिखावा केला पण नुकत्याच झालेल्या पावसाने खड्ड्यातील मुरूम माती वाहून गेल्याने खड्डे जैसेथेच झाले आहेत. वणी घोन्सा मार्गाचीही अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या मार्गावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ताच खड्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. वणी वडगाव रस्ता तर आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळत आहे. कित्येक दिवसांपासून हा रस्ता दुर्लक्षित असून बांधकाम विभागाने या रस्त्याला तालुक्याच्या हद्दीतूनच वगळले आहे की, काय असे वाटू लागले आहे. वणी मुकुटबन मार्गाचे दुरुस्तीकरणाचे काम कासवगतीपेक्षाही संथ गतीने सुरु असून या मार्गाने जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. काही ठिकाणी या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील गाव खेड्यांकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाल्याने संबंधित विभागा विषयी नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. हिच अवस्था शहरातील काही अंतर्गत व प्रमुख रस्त्यांची झाली आहे. शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात कित्येक दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन पडल्याने त्याना गंभीर जख्मा झाल्या आहेत. शहरातून जाणाऱ्या वणी यवतमाळ रोडवरही रेल्वे क्रॉसिंग पासून चौपदरी रस्त्यापर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. टिळकचौकातून स्टेट बँक मार्गे दीपक चौपाटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. गल्ली बोळातील रस्ते दुरुस्तीकरणाचा सपाटा सुरु असताना प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीकरणाकडे दुर्लक्ष व्हावे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. कित्येक दिवसांपासून प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही ते बुजविण्याची आवश्यकता संबंधित विभागाला वाटत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात झाल्यास त्याचे नवल वाटू नये. शहरातीलही काही रस्त्यांच्या दुरुस्तीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पण तेही अत्यंत कासवगतीने सुरु आहे. शहरातील वार्ड क्रं. २ मधील विठ्ठलवाडी येथून एसी बी लॉन मार्गे बाजाराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम मागील सात ते आठ महिन्यांपासून सुरु असून अद्याप खादीकरणाची प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्यानंतर काही महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले होते. या रस्त्यांवरूनही कित्येक दुचाकीस्वार घसरून पडून जख्मी झाले आहेत. शहर व तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था व ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे खड्डेमय रस्त्यांचा तालुका म्हणून वणी तालुक्याची ओळख निर्माण होऊ लागली आहे.