कोळसा खदाणीतून ट्रिप मारण्याच्या निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे वाढले आहेत अपघात
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
कोळसा वाहतूकदारांच्या खदानींमधून जास्तीतजास्त चक्कर लागण्याच्या असलेल्या अपेक्षांमुळे चालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली असून ट्रिप मारण्याच्या धुंदीत चालकांकडून अती वेगाने वाहने चालविली जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. ट्रक मालकांकडून बक्षिस व शाबासकी मिळविण्याच्या नादात ट्रक चालकांमध्ये ट्रिप मारण्याची शर्यत लागलेली असते. त्यांच्या या शर्यतीत कधी त्यांचेच तर कधी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकामध्ये दबून काल एका युवा ट्रक चालकाचा बळी गेला तर आज अती वेगाने कोळसा खाली करण्याकरिता जात असलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक निळापूर गावातील नाल्यासमोरील शेतात पल्टी झाल्याची घटना उघडकीस आली. सतत होणाऱ्या दुर्घटनांमुळे कोळसा वाहतूक अनियंत्रित झाल्याचे दिसून येत आहे.
उकणी खदाणीतील चेकपोष्ट जवळ ट्रकच्या चाकाखाली दबून युवा ट्रक चालकाचा काल नाहक बळी गेला. कोळसा भरल्या ट्रकची एंट्री करून गाडी जवळ परत आलेला ट्रकचालक अचानक समोरून येत असलेल्या ट्रक पासून स्वतःचा बचाव कारण्याकरीता गाडीच्या चाकामध्ये शिरला. अनावधानाने गाडी ढुलकल्याने चाकाखाली दबून त्याचा करून अंत झाला. ट्रिप मारण्याच्या धुंदीत चालक बेभान होऊन वाहने चालवीत असल्याने अपघात वाढले असून अनियंत्रत वाहतुकीमुळे नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. आज पहाटेच्या सुमारास कोलारपिंपरी कोळसा खदाणीतून कोळशाची वाहतूक करणारा ट्रक वणी रेल्वे सायडिंगवर कोळसा खाली करण्याकरिता सुसाट वेगाने जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो निळापूर गावातील नाल्यासमोरील शेतात उलटला. MH ३४ BG २६५४ क्रमांकाचा ट्रक कोलार पिंपरी खदाणीतून कोळसा भरून वणी रेल्वे सायडिंगवर खाली करण्याकरिता जात होता. कोळसा खदाणीतून कोळसा वाहून नेणारे ट्रक गावातून जातानाही तीव्र गतीने जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावातून सुसाट जाणाऱ्या ट्रकांमुळे कित्येकांचे बळी गेले आहेत तर कित्येक कास्तकारांची धडधाकट बैलं चिरडल्या गेली आहेत. ट्रिपांच्या लालसेत अती वेगाने वाहने चालविली जात असल्याने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या दुचाकीस्वारांचा नेहमी जीव टांगणीला लागलेला असतो. या अनियंत्रित कोळसा वाहतुकीमुळे आणखी बळी जाणार नाही याकडे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.