प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे घरकुल योजना रखडली, आमदार व नागराध्यक्षांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण !
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
शहर प्रशासन व नझूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे नगर परिषदेची घरकुल योजना मागील काही महिन्यांपासून रखडली असल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष व आमदारांनी रेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे. न.प. मुख्याधिकारी, नझूल अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना नझूल भूधारक लाभार्थ्यांच्या जागेची मोजणी करून पट्टे देण्याचे सयुक्तिक अधिकार असतांना देखील त्यांच्याकडून कर्तव्यात दिरंगाई करण्यात येत असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल बांधकामात अग्रेसर असलेली वणी नगर परिषद आर्थिक नियोजन असतानाही घरकुलाचा लाभ देण्यास लाचार बनली आहे. परिणामी नगर परिषद पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याने नगराध्यक्ष व नगरसेवकांनी ७ डिसेंबर पासून घरकुल संदर्भातील काही मागण्या पूर्ण होईस्तोर प्रशासना विरोधात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
मागील काही महिन्यांपासून नगर परिषदेची घरकुल योजना रखडली असून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नझूल जागेवरील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. न.प. च्या घरकुल योजनेंतर्गत २५ जून २०१८ रोजी एकूण १४८२ घरकुले मंजूर झाली होती. या व्यतेरिक्त स्वमालकीच्या जागेवरील १८९ घरकुले दिल्या गेली. १४८२ घरे ही नझूलच्या जागेवर मंजूर असून जागा स्वतःच्या मालकीची नसल्याने नगर परिषद त्यांना घरकुलाचा लाभ देण्यास असमर्थ ठरत आहे. २०११ च्या शासन निर्णया नुसार नझूल भूधारकांना कायमचे पट्टे द्यायचे झाल्यास न.प. मुख्याधिकारी, नझूल कार्यालय व उपविभागीय अधिकारी तशी कार्यवाही करू शकतात. नगर परिषदेने लाभार्थ्यांचे अर्ज मागविणे, डी.पी.आर. मंजूर करणे ही त्यांच्या कडील कार्यवाही २०१८ मध्येच पूर्ण केली आहे. पण त्यानंतरची कार्यवाही म्हणजेच जागेची मोजणी करणे, त्या जागेचा ८अ तयार करणे पूर्णतः प्रलंबित आहे. नझूल विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ही कार्यवाही अजूनही पूर्ण झालेली नाही. नगर परिषदेने वारंवार पत्रव्यवहार करूनही नझूल अधिकारी जागेची मोजणी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना पूर्णत्वास येण्यास बराच विलंब होत आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक नागरिकांचे स्वतःचे घर असावे ही पंतप्रधानांची महत्वाकांक्षा पूर्णत्वास येताना दिसत नसल्याने नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगर सेवकांसह आमरण उपोषणाला बसण्याचे ठरविले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेल्यांमध्ये वणी नगर परिषद अग्रेसर असताना नझूल अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी नझूल भूधारकांना कायमचे पट्टे देण्यात दिरंगाई केल्याने नझूल धारकांना घरकुल योजनेचा लाभ मिळू शकला नाही. त्यामुळे नगर परिषदेचे घरकुल वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही. आर्थिक नियोजन असतानाही लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यास न.प. लाचार झाल्याचे स्पष्टीकरण आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे पत्रकार परिषदेत दिले आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचा लाभ नझूल धारकांना मिळण्याकरिता नगर परिषदेने केलेल्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. न.प. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये घरकुल मंजूर असणाऱ्यांची सुद्धा मोजणी करून द्यावी, सर्व नझूल धारकांना त्यांच्या हक्काच्या जागेची ८अ प्रत देण्यात यावी, आरक्षित जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांनाही नियमानुसार स्वमालकीची जागा देण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला आमदार व नागराध्यक्षांबरोबरच नगरसेवक सुद्धा उपस्थित होते.