WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भांडणात मध्यस्थी करणाऱ्या कोळसा वाहतूकदाराचा अचानक प्रकृती बिघडल्याने झाला मृत्यू

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

कोळसा वाहतूक क्षेत्रात प्रचलित असलेल्या एका कोळसा वाहतूकदाराचा आपसी वादावादीनंतर अचानक प्रकृती बिघडल्याने नागपूरला उपचाराकरिता नेत असतांना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना १५ डिसेंबरला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. चालकाला हिरावल्याच्या कारणावरून दोन कोळसा वाहतूकदारांमध्ये सुरु असलेला वाद हाणामारीपर्यंत पोहचला असता त्यात मध्यस्थी करणाऱ्या वाहतूकदाराची नंतर अचानक प्रकृती बिघडल्याने आधी त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्वरित नागपूरला हलविण्याचा सूचना दिल्याने त्याला नागपूरला नेत असताना बुटीबोरी जवळच त्याची प्राणजोत मालविल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला अधीकृतरित्या मृत घोषित करून मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव शरीर कुटुंबियांच्या स्वाधीन केले. वाहतूकदारांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या अजित विरबहादूर सिंह उर्फ डब्लू सिंह (४०) रा. राजूर कॉलरी या कोळसा वाहतूकदाराची अचानक प्रकृती बिघडून झालेल्या मृत्यूने अनेक शंकाकुशंका निर्माण केल्या जात आहे.

विरबहादूर सिंह व जितेंद्र सिंह हे नातेसंबंधातील कोळसा वाहतूकदार एकत्र कोळशाची वाहतूक करतात. कोलडेपोचे कोळसा खदानीत छोटेमोठे कोळशाचे डिओ असतात. या कोळसा वाहतुकीचे कंत्राट संबंधित कोळसा वाहतूकदाराला दिले जातात. सध्या कोलारपिंपरी कोळसा खदाणीत कोलडेपोचे डिओ मोठ्या प्रमाणात लागले असून कोलडेपोच्या कोळसा वाहतुकीच्या परमिटवर वाहतूकदार कोळशाची वाहतूक करीत आहेत. विरबहादूर सिंह व जितेंद्र सिंह हे देखील याच खदाणीतून कोळसा वाहतुकीचे काम करीत असतांना सुंदरनगर येथील एका कोळसा वाहतूकदाराशी चालकाला हिरवण्यावरून पार्टनरच्या झालेल्या वादात मध्यस्थी करण्यास गेलेल्या विरबहादूर सिंह याला अचानक प्रकृतीत त्रास जाणवू लागला व काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याने खदान परिसरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्यात आधी १४ डिसेंबरच्या रात्री लालपुलीया वरील एका पेट्रोलपंप जवळ शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. १५ डिसेंबरला सकाळी खदान परिसरात त्यांच्यात कडाक्याचे भांडण होऊन हाणामारी होऊ लागल्याने विरबहादूर सिंह यांनी मध्यस्थी केली. तरीही भांडण थांबत नसल्याचे पाहून खदानीतील आणखी एक सिंह धावून आल्याने भांडणकर्त्यांचे धाबे दणाणले व सुंदरनगर येथील वाहतूकदार तेथून निघून गेला. नंतर खदान परिसरातील हॉटेलवर त्यांच्यात आणखी कडाक्याचे भांडण झाल्याचे समजते.

खदाणीत व कोळसा वाहतूक क्षेत्रात सुरुवातीपासूनच परप्रांतीयांचा भरणा राहिला आहे. वडील खदाणीत नोकरीवर असल्याने कोळशाशी निगडित व्यवसायात परप्रांतीयांनी आपली पकड मजबूत केली. एकजूट ही त्यांची सुरुवातीपासूनच ताकत राहिली आहे. खदान परिसरात गाड्या भारण्यावरून तर गाड्या लावण्यापर्यंत नेहमीच आपसी वाद सुरु असतात. संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कित्येक वाद विकोपाला गेले आहेत. खाजगी डिओच्या वाहतुकीला कोणतेही नियम व बंधने लावली जात नसल्याने खाजगी डिओच्या कोळशाची वाहतूक करणारी वाहने कुठेही मनमर्जीने उभी केली जातात. तर वाहतूकदार अधिकाऱ्यांवर शिरजोरी करीत असल्याचे पाहायला मिळते. वेळेचे बंधनही पाळले जात नसल्याचे दिसून येते. सुंदरनगर येथील (आधी प्रगतीनगर येथे राहणारा) कोळसा वाहतूकदाराशी चालकाच्या हिरवण्यावरून झालेल्या आपसी वादात मध्यस्थी करणाऱ्या वाहतूकदाराचा अचानक प्रकृती बिघडून काही वेळातच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. झुंडशाहीमुळे खदाणीत नेहमी वादंग होत असून वणी नॉर्थ क्षेत्राच्या खदानी झुंडशाहीच्या एकमेकांवरील हमल्यानी नेहमी चर्चेत असतात. खदाणीवर नेहमी झुंडशाहीशी संबंधित व्यक्तीचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळते. झुंडशाहीला लगाम लागणार नाही तोपर्यंत खदाणीत आपसी वादाच्या ठिणग्या उडतच राहतील.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share