आज शहरात निघणार ओबीसींचा विशाल मोर्चा
इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायाची जातीनिहाय जनगणना स्वतंत्र कॉलममध्ये करण्याच्या मागणीला घेऊन आज ३ जानेवारीला उपविभागीय कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या ओबीसी मोर्चाला अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दर्शविल्याने हा मोर्चा शहराच्या इतिहासातील विशाल मोर्चा राहणार असल्याचे अंदाज वर्तविले जात आहे. ओबीसी जातीनिहाय कृती समिती वणी, मारेगाव व झरी यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात येणाऱ्या या मोर्चात तिन्ही तालुक्यातील लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहावी याकरिता जातीनिहाय कृती समितीच्या वतीने शहराबरोबरच गांव पातळ्यांवरही अनेक सभा घेऊन नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले. मागील कित्येक वर्षांपासून ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली नसल्याने २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र कॉलममध्ये जनगणना करण्यात यावी, ही मागणी तीव्र स्वरूपात मांडण्याकरिता आज ३ जानेवारीला उपविभागीय कार्यालयावर ओबीसी (VJ/DNT/NT/SBC) विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणार आहे. मोर्चाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये याकरिता शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कृती समित्यांचेही मोर्चावर नियंत्रण असणार आहे.
ओबीसी समाजाच्या न्याय व हक्कासाठी काढण्यात येणाऱ्या या मोर्चाची सुरुवात जुना नगरवाला जीन (बस स्टँडच्या मागे) येथून होणार असून हा मोर्चा छत्रपती शवाजी महाराज पुतळा, संभाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, गाडगेबाबा चौक, सुभाषचंद्र बोस चौक, सर्वोदय चौक, रवींद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकमान्य टिळक चौक या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचणार असून उपविभागीय अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर शासकीय मैदान (पाण्याची टाकी) येथे या मोर्चाचा समारोप समारंभ होणार आहे. वाहनांकरिता नगर परिषद शाळा क्रं. ७ व एस.पी.एम. शाळेमागील मैदानात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ना भूतो, ना भविष्यती असा हा मोर्चा राहणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत असून मोर्चाच्या यशस्वीतेकरिता ओबीसी समाज बांधव अथक परिश्रम घेत आहेत.