WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरातील कृषीकेंद्रावरील धाडीत पावणेदोन लाखाची बोगस कीटकनाशकं जप्त

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

वणी नगर परिषदे समोरील विवेकानंद कॉम्प्लेक्स मधील एका कृषी केंद्रावर यवतमाळ जिल्हा परिषदच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी धाड टाकून १ लाख ८५ हजार रुपये किमतीची बोगस कीटकनाशके जप्त केली. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कृषी केंद्र चालकाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सुनील बिजाराम बोढे असे या अटक करण्यात आलेल्या कृषी केंद्र धारकाचे नाव आहे. सोमवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान हि कार्यवाही करण्यात आली असून रात्री १०.२५ वाजता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली.

स्थानिक विवेकानंद कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या बोढे कृषी केंद्रावर यवतमाळ जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र वसंतराव माळोदे यांनी धाड टाकून १ लाख ८५ हजार रुपये किमतीची कीटकनाशकं जप्त केलीत. कृषी विकास अधिकारी २० डिसेंबरला वणी येथील कृषी केंद्रातील बियाणे व कीटकनाशकांची तपासणी करण्याकरिता आले होते. त्यांनी बोढे कृषी केंद्रातील कीटकनाशकांची तपासणी केली असता त्यांना इमामेक्टीम बेन्झोयट (OCLEM Brand) हे कीटकनाशक बनावट असल्याचा संशय आल्याने त्यांनी या कीटकनाशकाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठवले. त्याचा अहवाल ४ जानेवारीला प्राप्त झाला. कीटकनाशकात ५ टक्के क्रियाशील घटक असणे आवश्यक असताना या कीटकनाशकाच्या नमुन्यांमध्ये ०.२२१ टक्केच क्रियाशील घटक असल्याचा अहवाल प्राप्त झाला. तसेच सदर नमुन्यावर उत्पादकता परवाना क्रमांक व कीटकनाशक ब्युरोचे नोंदणी क्रमांक नमूद केले नसून नमुन्यावर नमूद केलेला पत्ताही चुकीचा असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कीटकनाशकं बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी येथील बोढे कृषीकेंद्रावर धाड टाकून १ लाख ८५ हजार रुपये किमतीचे बोगस कीटकनाशकं जप्त करून कृषीकेंद्र चालक सुनील बोढे याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला रितसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी सुनील बोढे याला अटक करून त्याच्यावर शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी भादंवि च्या कलम ४२० नुसार तसेच कीटकनाशक कायदा १९६८ अंतर्गत नियम १३(१), १३(१)(A), २७(१), ९, १८ व १०(A), नियम १९७१ अंतर्गत १६,२०,३१ नुसार गुन्हे दाखल केले आहे.

पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share