वणी येथे क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची धाड, अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना मिळाली चार दिवसांची पोलीस कोठडी
वणी वरोरा रोड वरील गंगशेट्टीवार मंगलकार्यालय परिसरातील आमेर टॉवर भाग २ मधील एका बिल्डरच्या कार्यालयामध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळला जात असल्याच्या गुप्त माहितीवरून जिल्हा पोलीस दलाने अतिशय गोपनीय पद्धतीने कार्यालयावर टाकलेल्या धाडीत ६ लाख ३२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच बिल्डर सह चार आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात ही धडक कार्यवाही करण्यात आली असून ते स्वतः घटनास्थळी हजर झाल्याने या कार्यवाहीची तालुक्यात व जिल्ह्यात जोरदार चर्चा झाली. चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. १० जानेवारीला दुपारी ४ वाजता आमेर टॉवर भाग २ मधील बिल्डरच्या कार्यालयामध्ये टाकण्यात आलेल्या धाडीत कार्यालयाबरोबरच बिल्डरच्या घराचीही झडती घेण्यात आली. रात्री उशिरा पर्यंत ही कार्यवाही सुरु होती. आरोपीच्या घर झडतीत प्रकरणाशी संबंधित विशेष काही आढळले नसल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वणी येथील आमेर टॉवर भाग २ मधील जम्मू उर्फ जमीर मेहबूब खान (४०) याच्या कार्यालयात क्रिकेट सामन्यांवर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांना मिळाली. त्यांनी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांना पोलीस पथक तयार करण्यास सांगून वणी येथे सुरु असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर गोपनीय धाड टाकण्याची व्युव्हरचना आखली. त्यानुसार एपीआय अमोल पुरी व महिला एपीआय शुभांगी आगासे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक तयार करून साध्या वेशात त्यांना खाजगी ट्रॅव्हल्सने वणी येथे रवाना करण्यात आले. खाजगी ट्रॅव्हल्सने लग्न समारंभात आल्यागत पोलीस पथक गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात दाखल झाले. कुणाला काही कळायच्या आत अगदी फिल्मी स्टाईलने कार्यालयावर धाड टाकून पोलिसांनी क्रिकेट सामन्यांवर पैशाची बाजी लावणाऱ्या चारही आरोपींना ताब्यात घेतले. लगेचच जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रिकेटवर सट्टा चालविणारा प्रमुख आरोपी बिल्डर जम्मू उर्फ जमीर खान याला ताब्यात घेऊन त्याची रात्री उशिरा पर्यंत कसून चौकशी केली. जम्मू खान याच्या कार्यालयाबरोबरच त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली. पोलिसांनी जम्मू उर्फ जमीर मेहबूब खान (४०) या मुख्य आरोपीसह रियाज सत्तार शेख (४०), रिजाज अली ताहीर अली (३०), मो. सोहेब शब्बीर चिनी (२४) यांना अटक केली असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ४२०,४६५,४६८,४७१,३४, सह कलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच २५C टेलिग्राफ ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कडून रोख ३८ हजार ७६० रुपये, ४५ मोबाईल, २ टेलिफोन, ३ लॅपटॉप, एलईडी टीव्ही असा एकूण ६ लाख ३२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी पोलीस पथकासह वणी येथे येऊन अतिशय गोपनीय पद्धतीने क्रिकेट सट्ट्यावर टाकलेल्या धाडीची तालुक्याबरोबरच संपूर्ण जिल्हात चर्चा झाली. छुप्या मार्गाने अवैध धंदे सुरूच असल्याचे या धाडीने उघड झाले. जिल्हा पोलीस दलाच्या या धडक कार्यवाहीने छुप्या पद्धतीने अवैध धंदे चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या अल्टिमेटम नंतरही जिल्हा व तालुक्यात अवैध धंदे सुरूच असल्याने खुद्द पोलीस अधीक्षकांनाच आता कार्यवाहीचा बडगा उगारावा लागत आहे. आलिशान कार्यालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय गुप्त पद्धतीने चालविले जाणारे अवैध धंदे पाहून पोलीस अधिकारीही थक्कच राहिले.
पुढील तपास स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे करीत आहेत.