शहरातील खडबडा मोहल्ला येथील पंधरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी आरोपीला केले अटक !

एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पस्तीस वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची संताप जनक घटना २२ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी ३ वाजताच्या दरम्यान शहरातील खडबडा मोहल्ला येथे घडली. भेजारलेल्या मुलीने घडलेला प्रकार दुसऱ्या दिवशी आईला सांगितल्याने आईने मुलीसह त्वरित पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरुद्ध अत्याचाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच तात्काळ आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आई घरी नसल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या या नराधमाने अंगणात खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला स्वतःच्या घरी ओढत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संताप जनक घटना शहरात घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वासनांध प्रवृत्तीच्या पिसाळलेल्या या नरधामांमुळे महिला व मुली आजही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस स्टेशन हे महिलांना महेर व मुलींना आजोळ वाटावं या पद्धतीने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी असे त्यांनी पदभार स्वीकारतेवेळी पोलिसांना सुचविले होते.
शहरातील एका रेस्टोरंट मध्ये मजुरीचे काम करून उदर्निवाह करणारी महिला खडबडा मोहल्ला येथे आपल्या मुलाबाळासह राहते. महिलेच्या शेजारी हनुमान बालाजी राऊत (३५) याचे वास्तव्य आहे. महिलेची मोठी मुलगी आजारी असल्याने ती मुलीला उपचाकरीता ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेली. मुलीला सलाईन लावावी लागल्याने दोघीही मायलेकींना घरी यायला थोडा उशीर झाला. महिलेची पंधरा वर्षीय मुलगी व तिचा नातू घरीच होते. महिला दुपारी तीन वाजता रुग्णालयातून घरी परतली असता तिला लहान मुलगी आढळून न आल्याने तिने आपल्या नातवाला मुली बाबत विचारणा केली. नातवाने मावशीला शेजारच्या व्यक्तीने त्याच्या घरी ओढत नेल्याचे सांगितले. तसेच मावशीला घरात नेऊन सदर व्यक्तीने दारही बंद केल्याचे नातवाने सांगितले. घाबरलेल्या महिलेने हनुमान राऊत याच्या घराकडे धाव घेतली असता मुलगी रडत त्याच्या घरून बाहेर पडतांना दिसली. महिलेने सदर व्यक्तीकडे माझी मुलगी तुझ्या घरी कशी, अशी विचारणा केली असता त्याने महिलेलाच शिवीगाळ करीत मला माहिती नाही असे उत्तर देत महिलेसोबतच हुज्जत घातली. महिलेने मुलीकडे विचारणा केली असता भेजारलेली मुलगी काही एक सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. दुसऱ्या दिवशी वेदना असह्य होऊ लागल्याने तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. हे ऐकून महिला चांगलीच हादरली. तिने तात्काळ मुलीला सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले. आपल्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगत तिने त्याच्या विरुद्ध अत्याचाराची रीतसर तक्रार नोंदविली. २२ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता दरम्यान घडलेल्या अत्याचार प्रकरणाची २३ जानेवारीला सायंकाळी ६.२६ वाजता तक्रार नोंदविण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी लगेच हनुमान बालाजी राऊत (३५) रा. खडबडा मोहल्ला या नराधमाला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७६(३), ५०४,५०६ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ४,६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे या प्रकरणाचा तपास करीत आहे.