नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ८८ लोकांनी केले रक्तदान
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज २३ जानेवारीला स्थानिक सुभाषचंद्र बोस चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्रिमूर्ती गणेश मंडळ व स्पोर्टींग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिरात ८८ लोकांनी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, दिनकर पावडे, रवी बेलुरकर, शरद मंथनवार, श्रीकांत पोटदुखे, दिगांबर चांदेकर, बी. सुनील, अजय भटगरे, राजू गंगशेट्टीवार, नरेश रामगिरवार, स्वप्नील उरकुडे, सागर खडसे तथा आयोजन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर विधवा महिलांना मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.
शासकीय जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपूरच्या टीमने शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे रक्त रक्तपेढीत जमा करण्याचे कार्य पार पाडले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदानामुळे रक्ताची गरज असलेल्या एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र लढ्यात "तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा" असे देशवासियांना आव्हान केले होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता त्यावेळी रक्त सांडविण्याची गरज होती तर आता कुणाचा जीव वाचविण्याकरिता रक्तदानाची गरज आहे, असे मौलिक मार्गदर्शन रक्तदान शिबिराच्या उदघाटन समारंभात उपस्थित मान्यवरांनी केले.
शिबिराच्या समारोपीय समारंभात शहर वाहतूक शाखेचे नंदकिशोर आयरे प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरात रक्त संकलन करणाऱ्या चंद्रपूर येथील टिमचा त्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.