WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी मुकुटबन मार्गावरील पुलाच्या पाण्यात आढळला वरोरा येथील ग्रामसेवकाचा मृतदेह

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

वणी मुकुटबन मार्गावरील सिमेंट पुलाच्या बाजूला साचून असलेल्या पाण्यात ३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास एका इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. वरोरा येथील रहिवासी असलेला व मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दांडगाव (आपटी) ग्रामपंचायतेत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेला सुहास बापूजी झाडे (४७) हा इसम काकडे यांच्या शेताजवळील पुलाच्या पाण्यात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात ना ना विध चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत मृतकाचा मोठा भाऊ उमाकांत बापूजी झाडे (५२) रा. बोर्डा ता. वरोरा याने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार सुहास झाडे हा २ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता वरोरा येथील राहत्या घरून मीटिंगला जाण्याकरिता बसने निघाला. रात्री ९ वाजेपर्यंत त्याचा मोबाईल सुरूच होता. त्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी जवळच्या व्यक्तींकडे त्याची चौकशी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता गजानन कुरेकार यांनी सुहास हा कायर रस्त्यावर पुलाच्या पाण्यात मुतावस्थेत पडून असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच उमाकांत झाडे व त्यांच्या पत्नीने घटनास्थळावर धाव घेतली. सुहास हा संशयास्पद स्थितीत पुलाच्या पाण्यात मृतावस्थेत पडला होता. सुहास झाडे हा मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दांडगाव (आपटी) ग्रामपंचातेमध्ये ग्रामसेवक पदावर कार्यरत होता. तसेच वरोरा येथील किल्लावार्ड मध्ये वास्तव्यास होता. दोन तारखेला मीटिंगला जातो म्हणून घरून बाहेर पडलेल्या सुहासचा तीन तारखेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात शंकाकुशंकांना पेव फुटले आहेत. सुहासच्या अशा या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात हलविला. शवविच्छेदन अहवालानंतर खरं काय ते स्पष्ट होणार असून वणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share