दारू तस्करांवर पोलिसांनी कसला शिकंजा, आज आणखी तीन तस्करांना केली अटक
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यातून मोठ्या प्रमाणात होत असलेली दारूची तस्करी रोखण्याकरिता पोलिसांनी कंबर कसली असून दारू तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. काल २ फेब्रुवारीला डीबी पथकाने रात्री १२.४५ वाजताच्या दरम्यान दारू तस्करी करणाऱ्या दोन वाहनांवर कार्यवाही करून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ६ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मौर्य ले-आऊट चिखलगांव येथील धनेश्वर जोशी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या ओपटेरा मॅगनम व टाटा नॅनो या दोन कार मधून दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याठिकाणी उभ्या असलेल्या दोन्ही कारवर बारीक नजर ठेवली. मध्य रात्री ही दोन्ही वाहने दारू तस्करी करिता निघणार तोच पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून या दोन्ही वाहनांची झडती घेतली असता टाटा नॅनो कारमध्ये देशी दारूच्या २५ पेठ्या आढळून आल्या. दारू तस्करी करिता वेगवेगळ्या शकली लढवल्या जात असून पोलिसांना संशय येऊ नये याकरिता ना ना विधी तऱ्हा अवलंबिल्या जात आहेत. तस्करीतून मोठा नफा मिळत असल्याने पांढरपेशी लोकही आता तस्करीच्या धंद्यात उतरले आहेत. पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या आता कुंडल्या बनविणे सुरु केले आहे. पोलिसांना गुंगारे देत दारूची तस्करी करणाऱ्यांवर आता पोलिसांनीही लक्ष केंद्रित केले आहे. दारू तस्करी करिता करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगाचा आता कोणताही उपयोग होणार नसल्याचे पोलिसांनी तस्करांवरील कार्यवायांमधून सिद्ध केले आहे. मध्यरात्री दारूची तस्करी करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या दोन्ही घरगुती कार MH ०४ DY ५१९५ व MH ३४ AA ६९५४ ताब्यात घेऊन पोलिसांनी धनेश्वर भवानी शंकर जोशी (५२) रा. मौर्य नगर चिखलगांव, कुंदन कोकाजी चव्हाण (२७) रा. शारदा सॉ मिल मागे शास्त्री नगर या दोन आरोपीना केली आहे. त्यांच्याकडून २५ देशी दारूच्या पेठ्या किंमत ६५ हजार रुपये, तस्करी करिता वापरण्यात येणाऱ्या (ओपटेरा मॅगनम कार किंमत ५ लाख, टाटा नॅनो किंमत १ लाख) दोन कार व १८ हजार रोख रक्कम असा एकूण ६ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आणखी एक आरोपी विशाल लोणारे रा. सम्राट अशोक नगर यालाही अटक करण्यात आली आहे. या तीनही आरोपींवर महाराष्ट्र दारू बंदी कायद्याच्या कलम ६५(अ)(ई), ८२,८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, डीबी पथकाचे पोना सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पोकॉ. पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार यांनी केली.