रंगनाथ नगर येथील पेंटरने स्वतःला जाळून घेत केली आत्महत्या

/p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
शहरातील रंगनाथ नगर येथे राहणाऱ्या एका सुपरिचित पेंटरने स्वतःला जाळून घेतल्याची घटना काल ८ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. राहत्या घरी अंगावर थिनर टाकून पेटवून घेतलेल्या या पेंटरचा आज ९ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. शंकर पांडुरंग दुधलकर (३६) असे या जळून आत्महत्या केलेल्या पेंटरचे नाव आहे. त्याला आधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. व नंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. तो ५० ते ५५ टक्के जळाल्याने चंद्रपूर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
शंकर दुधाळकर हा पेंटर म्हणून सर्व परिचित होता. हात कलेच्या जोरावर त्याने परिसरात आपली ओळख निर्माण केली होती. त्याच्या उत्कुष्ट पेंटिंगमुळे त्याचा हात रिकामा रहात नसायचा. घटनेच्या दिवशीही तो शहिद भगत सिंग यांचे चित्र रंगवून आल्याचे समजते. पेंटर म्हणून एक अनोखी ओळख निर्माण केलेल्या या व्यक्तीने एकाएक स्वतःला जाळून घेतल्याने परिसरारात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन वर्षातच त्याचा घटस्फोट झाला. आई वडील व भावासोबत तो रहात होता. सायंकाळी पेंटिंगचे काम आटपून आल्यानंतर चाय मांडण्याच्या बहाण्याने घरात गेलेल्या शंकरने पेंटिंग करिता वापरण्यात येणारे थिनर अंगावर ओतून स्वतःला जाळून घेतले. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. चंद्रपूर येथे उपचारादरम्यान आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मद्य सेवन करीत असलेल्या या गुणी पेंटरने नशेमध्येच स्वतःला जाळून घेतल्याची चर्चा परिसरातून ऐकायला मिळत आहे. त्याच्या या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली असून शहर एका गुणी कलावंताला मुकल्याची भावना शहर वासियांमधून व्यक्त होत आहे.