दारूची तस्करी करणाऱ्या देशी दारू दुकान चालकासह तीन तस्करांना पोलिसांनी केली अटक, एसडीपीओ पोलिस पथकाची धडक कार्यवाही !
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
अवैध दारू विक्रेते व दारूची तस्करी करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिले असून त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने दारू तस्करी करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. दारू तस्करी करणाऱ्यांची माहिती गोळा करून पोलीस त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. मागील काही दिवसांत पोलिसांनी दारू तस्करांवर मोठ्या प्रमाणात कार्यवाही करून दारू तस्करांचे धाबे दणाणून सोडले आहेत. आज २३ फेब्रुवारीला पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास एसडीपीओ कार्यालयीन पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मारेगाव येथून चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या दारू घेऊन जाणाऱ्या दोन आलिशान गाड्या ताब्यात घेऊन तीन दारू तस्करांना अटक केली आहे. तर दोन तस्कर घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी ३ लाख ८८ हजार रुपये किमतीच्या देशी दारूसह १० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारू दुकानदारही पैशाच्या हव्यासापायी दारू तस्करीच्या धंद्यात उतरल्याने पोलिसही अवाक झाले आहेत.
एसडीपीओ कार्यालयीन पोलिस पथकाला मारेगाव येथील ए. वाय. जयस्वाल देशी दारू दुकानातुन दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. दारू बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात येथील देशी दारू दुकानातून मोठ्या प्रमाणात देशी दारू पोहचवली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून मारेगाव येथील अक्षरा बारच्या मागे असलेल्या ए.वाय. जयस्वाल देशी दारू दुकानासमोर उभ्या असलेल्या दोन आलिशान गाड्यांची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी ३ लाख ८८ हजार १२८ रुपये किमतीच्या देशी दारूसह MH ०२ BG ४६४३ व MH ३१ EF ४३४८ या दोन स्विफ्ट डिझायर कार, MH २९ U ७०९५ ही दुचाकी असा एकूण १० लाख १८ हजार १२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ए. वाय. देशी दारू दुकानाचा चालक निलेश जयस्वाल (३१) रा. यवतमाळ याच्यासह प्रमोद कृष्णाजी ठेंगणे (३३) रा. वार्ड नं ४ मारेगाव, अतुल रामदास वऱ्हाटे (२५) रा. घोडदरा ह.मु. वार्ड नं ११ मारेगाव या तीन आरोपीना अटक केली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटिल, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात मारेगावचे ठाणेदार जगदिश मंडलवार, पोउपनि अमोल चौधरी, पोहेकॉ आनंद अलेचवार, नापोकॉ प्रदिप ठाकरे, विजय वानखेडे, ईकबाल शेख, रविंद्र ईसनकर, परेश मानकर, नितीन खांदवे, शेख कलीम यांनी केली.