तालुक्यात आज आणखी पाच व्यक्तींना झाली कोरोनाची लागण
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात आज आणखी पाच व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मागील काही दिवसांत तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषयक नियमांकडे होणारे दुर्लक्ष कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे परत कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. शासन व प्रशासनाने ठरवून दिलेल्या कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने किंवा त्यांच्याकडून पालन करवून घेतल्या जात नसल्याने कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले आहे. सातत्याने रुग्ण वाढ होत असल्याने जिल्ह्याची लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु झाली आहे. आज २४ फेब्रुवारीला पाच व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२२३ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण २७ वर पोहचले आहेत.
आज १९ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. यवतमाळ कोरोना लॅबमध्ये आज पाठवलेल्या २३ नमुन्यांसह ३७ नमुन्यांचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह २७ रुग्णांपैकी १० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, २ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर १५ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले पाचही रुग्ण चिखलगांव येथील आहेत. तालुक्यात कोरोनाची परिस्थिती परत गंभीर वळण घेणार नाही याकरिता प्रशासनाने नियमांची सक्ती करण्याबरोबरच योग्य त्या उपाययोजना करण्याचीही गरज निर्माण झाली आहे.