फिरत्या पाणी विक्रीच्या गाड्यांवरील म्युझिक सिस्टिम मधून वाजविली जातात मोठ्या आवाजात गाणी
शहरात फिरत्या पाणी विक्रीच्या गाड्या प्रचंड वाढल्या असून पाणी विक्रीच्या व्यवसायात चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक पाणी विक्रेता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता वेगवेगळे प्रयोग करतांना दिसत आहे. कधी कधी पाणी विक्रेत्यांमधील स्पर्धा विकोपालाही जातांना दिसत आहे. काही पाणी विक्रेत्यांचे परिसर व ग्राहकही ठरलेले आहेत. शुद्ध पाण्याचा दस का दम ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून प्रत्येक पाणी विक्रेत्याचे ठरलेले ग्राहक दररोज पाणी विक्रीच्या गाडीची प्रतीक्षा करतांना दिसतात. प्रत्येक पाणी विक्रीच्या गाडीवर म्युझिक सिस्टिम लावण्यात आली असून त्यामधून वाजणारी वेगवेगळी गाणी प्रत्येक पाणी विक्रीच्या गाडीची ओळख ठरली आहे. प्रत्येकांची वेगवेगळी गाणी ठरलेली असून ती गाणी वाजली की, ग्राहकांना आपली ठरलेली गाडी आल्याचं कळतं व ते पाणी घेण्यासाठी घराबाहेर पडतात. नागरिकांना या आरोच्या पाण्याची सवयच झाली असून घरोघरी व हॉटेल दुकानांत हेच पाणी पिण्याकरिता वापरले जात आहे. पाणी विक्रीचा व्यवसाय शहरात इतका फळाफुलाला आला आहे की, फिरत्या पाणी विक्रीचा सर्वप्रथम प्रयोग करणारे राजकारणी व्यक्तीही विचारात पडले असतील. त्यांचा हा प्रयोग शहरात चांगलाच यशस्वी झाला आहे. पण पाण्याच्या गाडीवर लावण्यात आलेल्या मुझिक सिस्टिममुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्युझिक सिस्टिम मधून वाजणारी कर्णकर्कश गाणी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. तालुका शिवसेनेच्या वतीने २१ जानेवारीला करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात पाणी विक्रीच्या गाड्यांवरील म्युझिक सिस्टिम मधून वाजणाऱ्या गाण्यांवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती. पण त्याउलट परिस्थिती उध्दभवली असून आणखी मोठ्या आवाजात गाणी वाजविली जात आहे.
शहरात दिवसभर पाणीविक्रीच्या गाड्या फिरत असतात. पाण्याची गाडी आल्याचे संकेत देण्याकरिता गाड्यांवर म्युझिक सिस्टिम लावण्यात आली असून त्यामधून वेगवेगळी कर्णकर्कश गाणी वाजत असतात. मोठ्या आवाजात वाजविल्या जाणाऱ्या या गाण्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु असून त्यांच्या परीक्षेचा कालावधीही जवळ आला आहे. या सतत वाजणाऱ्या गाण्यांमुळे त्यांचे लक्ष विचलित होत असून त्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतांना दिसत आहे. शाळा महाविद्यालये व शासकीय प्रशासकीय कार्यालयासमोरही ही वाहने मोठ्या आवाजात गाणी वाजवीत असल्याने त्यांचे लक्ष विचलित होत असून त्यांच्यामधून कमालीचा संताप व्यक्त केल्या जात आहे. नाईटशिप करून आलेल्या व्यक्तींचीही या कर्णकर्कश गाण्यांमुळे झोपमोड होत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या आवाजात वाजणाऱ्या गाण्यांमुळे शहरातील नागरिक कमालीचे वैतागले असून पाणी विक्रीच्या गाड्यांवरील म्युझिक सिस्टिम मधून वाजणाऱ्या गाण्यांवर बंदी आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.