WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी उपविभागात वनराई बंधारे बांधण्याचे काम युद्धस्तरावर

Image

वणी:- येथील उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांच्या नेतृत्वात वणी व मारेगाव तालुक्यात वनराई बंधारे तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले आहे. पाच, सहा दिवसात वणी, मारेगाव तालुक्यात 170 बंधारे तयार करण्यात आले असून किमान 600 बंधारे बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

वणी व मारेगाव तालुक्यात जे नदीचे व नाल्याचे जिवंत प्रवाह आहेत. त्या प्रवाहांना अडवून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवून जमिनीतील पाण्याचा स्तर या बंधाऱ्यामुळे वाढणार आहे. त्यासाठी दि. 21 नोव्हेंबरला येथील महसूल भवन मध्ये वणी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे मूख्याध्यापक, प्राचार्य, सर्व कर्मचारी संघटना व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वनराई बंधारा बांधण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांनी केले.

त्यानुसार वणी तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी मिळून 138 बंधारे बांधणार आहेत. महिला बचत गट 50 बंधारे , विद्यालय व महाविद्यालय प्रत्येकी 5 बंधारे व वणी तालुक्यातील शिक्षक संघटनांकडून येथील निर्गुडा नदीवर दीड ये दोन हजार पोत्यांचा बंधारा बांधण्यात येणार आहे.

जलसंवर्धनासाठी सुरू असलेल्या या मोहिमेत समाजातील सर्वच स्वयंसेवी संघटना, संस्थांनी सहभागी होऊन देश कार्यासाठी एक पाऊल पुढे यावे व ज्यांच्याकडे प्लॅस्टिकची अथवा सिमेंटची रिकामी पोती असतील त्यांनी येथील तहसील कार्यालयात आणून द्यावे असे आवाहन डॉ.शरद जावळे व तहसीलदार श्याम धनमने यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share