WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

व्यायामामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास - तारेंद्र बोर्डे

Image

वणी:- शरीर निरोगी असेल तर मन निरोगी असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी या शाळेत सुरू होत असलेल्या या व्यायामशाळेचा उपयोग प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांना घ्यावा. व्यायामामुळे शारीरिक व बौद्धिक विकास होतो असे प्रतिपादन वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले. ते या शाळेत समाज सहभागातून मिळविलेल्या मुलांच्या खेळण्याच्या साहित्याचे व व्यायामशाळेच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे रमेश खडसे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून या प्रभागाचे नगरसेवक नितीन चहानकर, वर्षाताई खुसपुरे, प्रशासन अधिकारी संजय पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे बोलतांना पुढे म्हणाले की, या शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी ज्या प्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करून नगर परिषदेची पहिली व्यायामशाळा सुरू करण्यात यश मिळविले आहे. त्याप्रमाणे इतर नगरपालिकेच्या शाळेतसुद्धा व्यायाम शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी एक वर्षांपूर्वी 7 लाख रुपये निधी देऊन व्यायाम शाळेची इमारत बांधून दिली. त्यानंतर 7 लाख रुपयांचे व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले. या प्रसंगी नीतीन चहानकर यांनी या व्यायाम शाळेचा उपयोग विद्यार्थी व शिक्षकांनी नियमित करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात रमेश खडसे यांनी या विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून व्यायाम शाळेचे महत्व सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश तुंबडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रेमदास डंबारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीना काशीकर, रजनी पोयाम, दर्शना राजगडे यांनी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share