WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चोरी करणारी महिला गँग अटकेत, 'ते' चोरी करण्यासाठी रिक्षाने नागपूर गाठायचे

Image

एकटी महिला म्हणून आधीच महिला असलेल्या शेयर रिक्षाने तुम्ही प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देत असाल तर सावधान. सर्व महिला प्रवाशी असलेल्या ऑटोमध्ये उलटी आल्याचं नाटक सहप्रवासी असलेल्या महिलेचे दागिने चोरणारी महिला गँग सध्या नागपुरात सक्रिय आहे. एकमेकांच्या 'जावा' असलेल्या अशाच एका टोळीला नागपूर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. विशेष म्हणजे नागपुरात दागिने चोरण्यासाठी ही टोळी थेट वर्ध्यातून रिक्षाने नागपूरमध्ये येत असे.

56 वर्षीय फिरोजा बेगम या 26 फेब्रुवारीला औषध घेण्यासाठी इंदोरा परिसरात आल्या होत्या. औषध घेतल्यानंतर त्यांनी मंसुरी कॉलनीला जाण्यासाठी शेयर ऑटो पकडली. फिरोजा एकट्या असल्याने आधीच महिला बसलेल्या रिक्षाला त्यांनी प्राधान्य दिलं. मात्र इथेच त्यांचा घात झाला. थोड्या अंतरावर गेल्यावर ऑटोमधील महिला सहप्रवाशाने उलटी आल्याचं सोंग केलं. उलटी आल्याचं पाहून ऑटोमध्ये एकच गोंधळ उडाला. तेवढ्यात रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली. त्यानंतर फिरोजा बेगम लगेच थांबलेल्या रिक्षाच्या बाहेर उतरल्या. त्यानंतर रिक्षा चालकाने लगेच इतर सर्व प्रवाशांसह रिक्षासह पळ काढला. फिरोजा बेगम यांनी अंगावरील दागिने तपासले असता आपल्या गळ्यातील 2 तोळ्यांची सोन्याची गोफ सोबतच्या महिला प्रवाशांनी पळवल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

फिरोजा बेगम यांनी याबाबत जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार केली. फिरोजा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले. अनेक रस्त्यांवर एक संशयित रिक्षा सर्व महिला प्रवाशांसह दिसून आली. मात्र रिक्षाचं पासिंग नांदेडचं असल्यानं पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यानंतर पोलीस तपासात दुसऱ्या दिवशी दयानंद पार्कजवळ तीच रिक्षा सापडली आणि पोलिसांनी शेख फिरोज या चालकाला ताब्यात घेत विचारणा केली. त्यानंतर नागपुरात महिला चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचं समोर आलं.

या टोळक्याचं नेतृत्व दोन सख्ख्या जावा रंजीता आणि कुमा पात्रे करत होत्या. रिक्षाचालक त्यांच्याच टोळीचा सदस्य आहे. टोळी दागिने घातलेल्या एकट्या महिलेला आपल्या रिक्षामध्ये बसवून घ्यायची. त्यानंतर टोळीतील एक महिला उलटी आल्याचं नाटक करायची. तर दुसरी घाबरण्याचं नाटक करत हळूच शेजारी बसलेल्या महिलेच्या गळ्यात हात घालून तिचे दागिने लंपास करायची. महिलांचा गोंगाट ऐकून रिक्षाचालक रिक्षा थांबवायचा आणि पीडित महिला खाली उतरताच रिक्षा घेऊन ही गँग फरार व्हायची.

विशेष म्हणजे नांदेडचा वाहन क्रमांक असलेली ही टोळी वर्ध्यातून नागपूरला यायची आणि चोऱ्या करून ऑटोनेच पुन्हा वर्ध्याला पळून जायची. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. या टोळीतील इतर काही महिला सदस्य फरार असल्याचा पोलिसांना संशय आहे.. सध्या या टोळीने नागपूरात तसेच इतर शहरात आणखी काही महिलांना टार्गेट केलं आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share