WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

‘त्या’ बलात्कार पीडितेची प्रसूती होऊन बाळ दगावले

Image

बलात्कारानंतर गर्भवती झालेल्या एका १२ वर्षीय पीडितेची अखेर चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी सकाळी प्रसूती झाली. यात बाळ दगावले. हे प्रकरण उच्च न्यायालयात सुनावणीला येण्यापूर्वीच ही घटना घडल्याने न्यायालयाने पीडित मुलीच्या प्रकृतीची सद्यस्थिती सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

२४ मार्चला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील पीडित १२ वष्रे चार महिन्यांची आहे. हे प्रकरण लक्षात आले तेव्हा पीडिता २२ आठवडय़ाची गर्भवती होती. तिने गर्भपातासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना तज्ज्ञांची समिती स्थापन करून अहवाल मागवला. तज्ज्ञांनी पीडितेची आरोग्य तपासणी करून अहवाल सादर केला. या अहवालात गर्भ २३ आठवडे आणि ५ दिवसांचा आहे. गर्भात प्राण आले आहे. या वयात पीडितेची प्रसूती झाल्यास तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे नमूद होते.त्यानंतर आज बुधवारी न्या. विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दुपारी १२.१५ वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा सुनावणीला सुरुवात झाली. त्यावेळी सकाळी आपत्कालीन परिस्थितीत पीडितेची प्रसूती झाली असून बाळ दगावल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर पीडितेच्या वकिलांनी बलात्काराचे प्रकरण असल्याने मृत बाळाचे नमुने जोपासण्यात यावे व पीडितेच्या प्रकृतीची काळजी घेण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने तिच्या प्रकृतीची सद्यस्थिती व मृत बाळाचे नमुने साठवण्यासंदर्भात आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. स्वीटी भाटिया आणि राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन राव यांनी काम पाहिले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share