WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मनसेचा अभिनव संकल्प! तरुणांना इंपोर्ट- एक्सपोर्ट व डिजिटल मार्केटिंगचे मोफत प्रशिक्षण!

Image

मुंबई: करोना व लॉकडाउनचा फटका साऱ्या देशालाच नव्हे तर जगाला बसत आहे. लॉकडाउन नंतर काय होणार हा प्रश्न शेतकरी, तरुण, बेरोजगार, उद्योजक आदी साऱ्यांनाच भेडसावत असताना मनसेने ‘चला उद्यमी महाराष्ट्र घडवूया’ हा उपक्रम महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत हाती घेतला आहे.

प्रामुख्याने शेतकरी बांधव, तरुण व बेरोजगारांना मनसेच्या ‘चला उद्यमी महाराष्ट्र घडवूया’ उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. याअंतर्गत आपला माल एक्सपोर्ट कसा करायचा तसेच आयात करायचे झाल्यास एखादी वस्तू वा सामान इंपोर्ट कसे करायचे ते ऑनलाइन शिकवले जाणार आहे. याचबरोबर डिजिटल मार्केटिंग चे तंत्रही शिकविण्यात येणार असून यासाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कोसळले आहेत. लॉकडाउनचा फटका जगातील दोनशेहून अधिक देशांना बसला आहे. भारत हा शेतीप्रधान देश मानला जात असून आज शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडले आहे.

लॉकडाउनमुळे देशातील सर्वच उद्योग-धंदे ठप्प झाले असून ही परिस्थिती आणखी किती काळ चालेल याचा अंदाज कोणालाच नाही. ज्या ठिकाणी करोनाची फारशी लागण नाही तेथे काही प्रमाणात उद्योग सुरु व्हावे अशी अपेक्षा उद्योग जगत व्यक्त करत आहे. महाराष्ट्रालाही लॉकडाउनचा मोठा फटका बसला असून यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. हातावर पोट असलेल्यांची अवस्था आज पराकोटीची वाईट असून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या लाखो तरुणांना भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले हा प्रश्न पडला आहे. शेतकरीही पुरता पिचला असून लॉकडाउनचा काळ वाढला तर करायचे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी हा मुद्दा उपस्थित करत अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजे अशी भूमिका मांडली होती. नेमका हाच धागा पकडून मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ ओंकार माळी यांनी शेतकरी तसेच तरुणांसाठी इंपोर्ट- एक्सपोर्ट आणि डिजिटल मार्केटिंग व्यवसाय मोफत प्रशिक्षण देण्याची योजना आखली. एमबीएच्या तीन पदव्या, इंपोर्ट- एक्सपोर्टची पदवी तसेच पीएचडी केलेल्या ओंकार माळी यांनी उद्यमी महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शेतकरी, तरुण व महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून हा ऑनलाइन उपक्रम असेल असे त्यांनी सांगितले. लॉकडाउनचा काळ मुंबई- पुण्यात वाढणार हे जवळपास निश्चित आहे. वेळेचा सदुपयोग म्हणून ३६ तासांचा हा ऑनलाइन उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ओंकार माळी यांनी केले आहे. रोज दोन तास प्रशिक्षण कालावधी असेल. मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य असून संपर्कासाठी ९३३३५७९३३३ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share