कोरोनाचे आधीचे १९ अहवाल निगेटिव्ह तर ४३ नमुने नव्याने तपासणी करीता पाठवले


प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात आज नव्याने दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने त्यांच्या संपर्कातील ४३ व्यक्तींचे नमुने आज तपासणी करिता पाठविण्यात आले आहे.आधीच्या प्रतिबंधित क्षेत्र एक,दोन व तीन येथील संशयितांचे तपासणी करिता पाठवलेले १९ रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २२ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे. आज नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ३५ व्यक्तींना (हायरिस्क) संस्थात्मक विलीगीकरणात ठेवन्यात आले असून ९६ व्यक्तींना (लो रिस्क) होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली असून ४ रुग्ण यवतमाळ येथे तर पाच रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहेत.
मागील सहा दिवसांपासून शहरात एकाही व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला नसल्याने कोरोनाची साखळी तुटली असल्याचे भासत असतांनाच आज नव्याने २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. २४ जूनला मुंबई कनेक्शन कुटुंबाकडे अकाऊंटिंगचे काम करणारा व २७ जूनला घरकाम करणाऱ्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरले. परंतु एकाच दिवसात जनता कर्फ्यू मागे घेण्याची नामुश्की ओढावली. त्यानंतर २८ जून पासून ३ जुलै पर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे कोरोनाची साथ आटोक्यात आल्याचे जाणवू लागले होते. प्रशासनाच्या उत्तम प्लॅनिंगमुळे प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोनाचे संक्रमण रोखण्यात यश आले असतांनाच शहरातील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली. लगेचच त्याच्या नाते संबंधातील व्यक्तीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे कोरोनाची संख्या सात वरून नऊ वर पोहोचली. मुंबई कनेक्शन नंतर जळगाव कनेक्शन शहरात कोरोनाचे संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलल्या जात आहे. सहा दिवसांपासून कोरोनाचा रुग्ण ना आढळल्याने शहरवाशियांमधील भीती ओसरू लागली असतांनाच रुग्णांत वाढ झाल्याने जनता परत एकदा भीतीच्या सावटात आली आहे. हॉसस्पॉट जिल्ह्यातून येणाऱ्यांमुळे कोरोनाची लागण होत असल्याने येथील जनतेमध्ये नाराजी दिसून येत आहे. प्रशासनाने स्वतःहून तपासणी करण्याचे खुले आव्हान केले होते.पण भीतीपोटी लोकं समोर येत नसल्याने प्रशासनही चिंतेत पडले आहे. अजूनही कुणी भीतीपोटी कोणतीही माहिती दडवून ठेवली असेल किंवा कुणाला कोरोना सदृश्य लक्षणे जाणवत असेल तर कसल्याही प्रकारचा संकोच मनात न ठेवता प्रशासनाला माहिती द्यावी. कोरोनासंबंधीचा तुमचा पुढाकाराच तुमचा व तुमच्या संपर्कातील लोकांचा बचाव करू शकतो. सतर्कतेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याने शासन व प्रशासनाने सुचविलेल्या कोरोना विषयक नियमांचे कठोरतेने पालन करून शहरातून कोरोनाला हद्दपार करण्यास सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.