व्यावसायिक होता बाधित जनता आली धास्तीत
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या कोविड - १९ या आजाराने बाधित झालेल्या रुग्णाची संख्या आता वाढीस लागली असून शहरात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दहा झाली आहे. काल ८ जुलैला शहरात दहाव्या रुग्णाची नोंद झाली असून रुग्ण आढळलेला साईनगरी परिसर सील करण्यात आला आहे. तसेच परिसरात फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील २० ते २५ जणांना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून त्याच्या संपर्कातील आणखी व्यक्तींचा शोध घेतल्या जात आहे. कोरोना सदृश्य लक्षणे जाणवू लागल्याने सदर व्यक्तीने नागपूर येथे जाऊन स्वतःची कोरोना तपासणी करून घेतली. काल ८ जुलैला त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली. प्रशासनाने रुग्ण राहत असलेल्या परिसराकडे धाव घेत तातडीने तो परिसर सील करून पॉजिटीव्ह व्यक्तीला पुढील उपचारा करिता यवतमाळ येथे हलविले आहे. दरम्यान काल रात्री प्रलंबित असलेल्या २९ नमुन्यांपैकी आणखी २२ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरात आता पाच प्रतिबंधित क्षेत्र झाले असून सुरुवातीच्या तीन प्रतिबंधित क्षेत्रातील संशयितांचे बरेचसे अहवाल निगेटिव्ह आल्याने या कंटेनमेंट झोन मधील कोरोनाची साखळी जवळपास तुटली असल्याचे जाणवत आहे. प्रशासनाची प्रत्येक झोन मधील नागरिकांच्या हालचालीवर करडी नजर असून नव्याने कोरोना साखळी तयार झालेल्या परिसरावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागातर्फे आशासेविकांमार्फत प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची रुग्णांच्या संपर्काबाबत विचारणा करून प्रत्येकाचे स्कॅनिंग केल्या जात आहे. एकामागून एक नव्याने कोरोना साखळी तयार होत असल्याने प्रशासनावरील तान वाढला आहे.
शहरात २८ जून ते ३ जुलै या कालावधीत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने कोरोनाची साखळी तुटली असल्याचे वाटत असतांनाच ४ जुलैला व्यावसायिक कुटुंबातील दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह निघालं. त्यानंतर तीन दिवसांनी आणखी एक व्यावसायिक पॉझिटिव्ह निघाल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांमध्ये भीती संचारली आहे. शहरातील गजबजलेल्या पॉश वसाहतीतील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहर वासियांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाला ३ महिने शहरापासून दूर ठेवले. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने परठिकाणांवरून नागरिकांचे शहरात आगमन होऊ लागले. तर काही व्यावसायिकांचे कामानिमित्त सतत परठिकाणी येणे जाणे सुरु झाले. प्रत्येकच ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परठिकाणांवरून येणाऱ्यांमुळे शहरात कोरोनाचा फैलाव होऊ शकतो या चिंतेने सामान्य वनीकर जनतेला सुरुवातीपासूनच ग्रासले होते. सामान्य जनतेने कोरोनाची लागण होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेत परठिकाणी येणे जाणेही बंद केले होते. तरीही परठिकाणांवरून येणाऱ्यांमुळे नेहमी दहशतीत असणाऱ्या वनीकर जनतेला अखेर कोरोनाचा सामना करावाच लागला. एक व्यक्ती कोरोना बाधित आढळली तरी संपूर्ण परिसर सील करावा लागत असल्याने परिसरातील अन्य व्यक्तींना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांना विनाकारण बंधिस्त व्हावं लागत असल्याने ते वेठीस आले आहेत. व्यावसायिकांच्या आऊट ऑफ सिटी कनेक्शनने कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले असून यामुळे सामान्य जनता चांगलीच वेठीस आली आहे. शरीरातील प्रतिकार शक्तीच्या अभावामुळे अन्य शारीरिक व्याधींनी ग्रासलेल्या व्यक्तीला अतिशीघ्र कोरोनाची लक्षणे जाणवू लागतात. ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नसल्याने ते ठनठणीत दिसतात पण त्यांच्यापासून कोरोनाची बाधा होऊ शकत नाही असे नाही. त्यांच्यापासून बाधा झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तर त्यांच्यात हि लक्षणे अल्पावधीतच दिसू लागतात. त्यामुळे अगदी जवळच्या सम्पर्कातील व्यक्तिंपासूनच कोरोनाचा संसर्ग होण्याची जास्त संभावना असते. टॅंकरचा ड्रायव्हर डायरेक्ट मालकाच्या संपर्कात येत नसून तो मॅनेजरच्या आधी संपर्कात येतो. दोन्ही स्वतःचे टँकर असल्याने ड्रायव्हरही त्यांनीच ठेवलेले असून ड्रायव्हरवर त्यांची निगराणी असतेच. व्यावसायिक प्रतिष्ठानावर मोठा स्टाफ कार्यरत असल्याने टँकर खाली करण्याचे सोपस्कारही प्रतिष्ठानातील मॅनेजरच पार पडतो. टँकर खाली होईस्तोर ड्रायव्हर गाडीतच असतो. टँकर खाली झाल्यानंतर त्याला खाली झाल्याच्या एनओसीवर सही शिक्का मारून द्यावा लागतो. व टँकर पूर्णपणे खाली झाल्याची पंपावरील माणसे खात्री करून घेतात. तेंव्हा मालकाशी ड्रायव्हरचा डायरेक्ट संपर्क येण्याचे काही कारणच नसते. परठिकाणांवरून येणाऱ्यांमुळे किंवा स्वतः परठिकाणी जाऊन आल्यामुळे कोरोनाची बाधा होत असून अशा व्यक्तींनी स्वतःची खबरदारी घेऊन स्वतःला इतरांपासून वेगळे ठेऊन त्वरित कोरोना चाचणी करून घेण्याचे आव्हान प्रशासन तर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी शहरात कुठेही वावरतांना स्वतःच्या सुरक्षिततेकरिता तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. शिंकताना किंवा खोकताना नाका तोंडातून निघणारे शिंतोडे सहा फुटांपर्यंत उडतात. थुंकण्यातून विषाणू जमिनीवर पडतो. जागतिक आरोग्य संघटनेचा असा समाज आहे की कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या ड्रॉपलेट्स ने होतो. जर छोटे ड्रॉपलेट्स कोरोनाचे मुख्य संवाहक बनत असतील तर एकमात्र बचाव मास्क वापराने हाच आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.