शहरातील आणखी एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या झाली चौदा !
महिला राहत असलेला तेलीफैल परिसर सील, १३ व्यक्तींना केले क्वारंटाईन
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोनाचा विळखा वाढत असून काल सेवाग्राम येथे उपचारा करिता दाखल झालेल्या महिलेला कोरोनाची लागण झल्याचे समोर आल्याने शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता १४ झाली आहे. कालच विदेशात एमबीबीएस चे शिक्षण घेत असलेल्या शहरातील एका तरुणाचा यवतमाळ येथे अँटीजण चाचणी द्वारे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर महिला राहत असलेला तेलीफैल परिसर सील करण्यात आला असून महिलेच्या कुटुंबातील व अति संपर्कातील १३ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून ४० व्यक्तींना (लो रिस्क) होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर महिलेने आधी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार केल्याचे समजते. नंतर तिला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात रेफर होण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु पैशाच्या नियोजनाच्या अभावातून सदर महिलेला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिची कोरोना चाचणी करण्यात आली. काल १० जुलैला तिचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला. त्यात तिला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. काल रात्री उशिरा शहरात ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली असून शहरवासीयांमध्ये कमालीची धास्ती निर्माण झाली आहे.
७ जुलैला साईनागरी येथील एक व्यावसायिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या नंतर ८ जुलैला पेट्रोलपंप व्यवसायकांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर एक दिवसा आड १० जुलैला रशिया येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या शहरातील एका तरुणाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. विदेशातून मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर सदर तरुणाला कोरोना सदृश्य लक्षणे जाणवू लागल्याने त्याने तेथूनच यवतमाळ येथील रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली. त्याला काही दिवस तेथेच क्वारंटाईन ठेवल्यानंतर त्याची अँटीजण कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यात तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच दिवशी सायंकाळी तेलीफैल परिसरातील ६५ वर्षीय महिलेचा सेवाग्राम येथे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील कोरोना बाधितांचा आकडा १४ पर्यंत पोहचला आहे. यादरम्यान नागपूर व यवतमाळ येथे उपचार घेत असलेल्या पाच व्यक्ती कोरोनमुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे शहरातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ९ झाली आहे. महिला राहत असलेल्या तेलीफैल परिसरातील तिच्या घरा सभोतालचा काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. एका पाठोपाठ एक कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनावरील तान चांगलाच वाढला आहे. महिलेच्या संपर्कातील १३ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून ४० व्यक्तींना (लो रिस्क) होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. संपर्कातील आणखी व्यक्तींचा शोध घेतल्या जात आहे. कोविड केंद्रात ५७ व्यक्ती आधीच विलीगीकरणात असून आज ११ व्यक्तींना विलीगीकरणात हलविण्यात आले आहे. लॉकडाऊन मधून मोकळीक मिळताच शहरात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. हळूहळू बंद असलेली सर्वच प्रतिष्ठाने सुरु झाली असून दुकानांच्या वेळेची मर्यादाही वाढविण्यात आली आहे. शहरात उसळणाऱ्या गर्दींमधून कोरोनाचे संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या संक्रमणावर थोडेफार नियंत्रण राहावे याकरिता जनता कर्फ्यूचा मार्ग निवडण्यात आला होता. परंतु राजकीय धुरंधरांच्या चढाओढीत एकाच दिवसात जनता कर्फ्यू गुंडाळावा लागला. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनही हादरले असून प्रतिबंधित क्षेत्राची दक्षता घेतांना प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे. शहरात आता ६ प्रतिबंधित क्षेत्र झाले असून आरोग्य विभागामार्फत या क्षेत्रातील नागरिकांची योग्य काळजी घेतल्या जात आहे. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्या करिता हरसंभव प्रयत्न करीत असून नागरिकांनाही सतर्कतेचे आव्हान करण्यात आले आहे.