शहरातील सात रुग्ण कोरोनमुक्त झाले असून १६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत
कोविड केंद्रात योग्य आहार मिळत नसल्याचा विडिओ वायरल, त्यावर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने शहरवासियांमध्ये थोडी भीती तर थोडे समाधान पाहायला मिळत आहे. १४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ७ झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील १७ संशयितांचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले होते. १७ नमुन्यांपैकी १६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचे परत सॅम्पल घेऊन तपासणी करीता पाठविण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी कळविले आहे. आज आणखी १२ व्यक्तींचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान आज कोविड केयर सेंटर मधील असुविधा व निकृष्ठ जेवण मिळत असल्याचा व्हिडिओ शहरात चांगलाच वायरल झाला असून नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओ मध्ये कोविड केयर सेंटर मध्ये असलेली असुविधा, अस्वच्छता व निकृष्ठ जेवण मिळत असल्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या व्हिडिओत दाखवण्यात आलेल्या कोविड केंद्राच्या परिस्थिती बाबत एसडीओ शरद जावळे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी हा व्हिडिओ जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाची जाणीव पूर्वक बदनामी करून शहरातील वातावरनात विषमता निर्माण करण्याचा हा कुटील डाव आहे. जेवणाचा जो व्हिडिओ तयार करण्यात आला त्याबाबत चौकशी करण्यात आली असता कोविड केयर सेंटरमध्ये क्वारंटाईन व्यक्तींना जे जेवण दिल्या जाते तेच जेवण तेथील अधिकारी व अन्य कर्मचारीही जेवत असतात. क्वारंटाईन व्यक्ती व अधिकारी स्टाफ यांना एकसारखेच जेवण दिल्या जात असल्याचेहि चौकशीत निष्पन्न झाल्याचे एसडीओ शरद जावळे यांनी स्पष्ट केले आहे. आज पर्यंत निकृष्ट जेवण मिळत असल्याची कुठलीही तक्रार प्राप्त झाली नसून जर तेथे व्यवस्थित जेवण मिळत नसल्यास तेथील डॉक्टरांच्या निदर्शनास आणायला हवे होते. कोविड केयर सेंटर मध्ये नास्ता, पाणी,जेवण व स्वच्छता याबाबत विशेष काळजी घेतल्या जात असून त्यावर देखरेख ठेवण्या करिता नायब तहसीलदारांची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आली असल्याचेही एसडीओ डॉ. जावळे यांनी सांगितले आहे. आज शहरात वायरल झालेल्या व्हिडिओने कोविड केंद्रातील मिळणाऱ्या आहाराबाबत प्रश्न चिन्ह निर्माण केले असतांनाच प्रशासनाने त्याचे खंडन करून कोविड केंद्र सर्व सुविधांनिशी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.