शहरात आणखी तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली अठरा !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून आज आणखी ३ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या आता १८ झाली आहे. पॉझिटिव्ह निघालेले तीनही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्र सहा मधील बाधित महिलेच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पळसोनी येथील कोविड केंद्रातून त्यांना यवतमाळ येथे पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. शहरात दिवसा गणिक कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासन चांगलेच चिंतेत आले आहे. आज १० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ७ व्यक्ती निगेटिव्ह तर ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांचा आलेख वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १८ वर पोहचला आहे. ७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून निव्वळ बाधित रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे.
शहरात काल १२ जुलैला प्रतिबंधित क्षेत्र पाच मधील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनावरील तान वाढला असून शहरवासियांमधील भीतीही चांगलीच वाढली आहे. एकामागून एक पॉझिटिव्ह रुग्ण निघत असल्याने आरोग्य प्रशासन चांगलेच हादरले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सोयी सुविधा पुरवितांना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. संशयितांचे लोकेशन ट्रेस करून जास्तीत जास्त व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वणी भेटी दरम्यान दिल्या होत्या. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील अधिकाधिक व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान लवकर लागत आहे. शहर प्रशासन व आरोग्य प्रशासनाची प्रतिबंधित क्षेत्रावर करडी नजर असून तेथील नागरिकांची योग्य ती दक्षता घेतली जात आहे. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्याकरीता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.