WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुकुटबन येथील सिमेंट कंपनीतील आणखी चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली आठ !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेंट प्लांट मधील परप्रांतीय मजुरांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले असून आज आणखी ४ परप्रांतीय मजुरांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने लोकांच्या एकत्रीकरणातून संसर्ग वाढू नये म्हणून उद्योग व्यवसायासह कंपन्याही बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे रोजगार हिरावला गेल्याने उदरनिर्वाहाचे संकट निर्माण होऊन आर्थिक विवंचनेत अडकलेले परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात आपापल्या राज्यात परतले. परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या साधनाने एरव्ही पायदळही आपापल्या राज्यांकडे जाऊ लागले. त्यांची अधीरता पाहून शासनाने त्यांना त्यांच्या स्वराज्यात पाठविण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करून दिली. या सर्व घडामोडीत कित्येकवेळा कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊन शासन व प्रशासनाला परप्रांतीयांवर नियंत्रण मिळवितांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. परंतु आता संचारबंदीचे नियम शिथिल झाल्याने व कंपन्यांना परप्रांतीय मजुरांची आवश्यक्ता भासू लागल्याने परप्रांतीय मजुरांना आमंत्रित केल्या जात असून कंपन्या व उद्योजकांमार्फत त्यांच्या येण्याची व्यवस्थाही केल्या जात आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूरांचे शहर व तालुक्यातील कंपन्यांमध्ये आगमन होऊ लागले असून त्यांची योग्य दक्षता न घेतल्यास ते कोरोनाचे संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात. २६ जुलैला रिलायन्स सिमेंट कंपनीत परप्रांतातून आलेले मजूर क्वारंटाईन असतांना ३० जुलैला त्यांच्यातील ३ मजुरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर आज आणखी ४ उत्तर परदेशातील मजुरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीती संचारली आहे. परराज्यातून आलेल्या लोकांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने एकीकडे प्रशासन चिंतेत आले आहे तर दुसरीकडे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शहरातील युवकांची रोजगारासाठी भटकंती सुरु आहे तर परप्रांतीयांना आमंत्रित करून कोरोनाची उत्पत्ती वाढविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. आरसीसीपीएल या सिमेंट कंपनीतील आज आणखी ४ मजूर पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८ झाली असून ३ जुलैला एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली आहे. आरोग्य अधिकारी आपल्या पथकासह त्याठिकाणी दाखल झाले असून रुग्णांना पुढील उपचारा करिता यवतमाळ येथे पाठविण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना त्याच ठिकाणी क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share