WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने गायीला चिरडले !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने गायीला चिरडल्याने ती जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास वणी घुगुस रोडवरील जन्नत फंक्शन हॉल पासून थोड्या अंतरावर घडली. गायीला चिरडल्यानंतर घटनास्थळी ट्रक सोडून चालक फरार झाला. त्याठिकाणी तत्परतेने पोहचलेल्या वाहतूक पोलिसांनी कुणीही तक्रार द्यायला तयार नसल्याने तेथून काढता पाय घेतला. ट्रक मालक व गायीच्या मालकांनी आपसात निपटारा करण्याची तयारी दर्शविल्यानंतरही त्यांच्यात चांगलाच वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. कित्येक वेळपर्यंत तर ट्रक घटना स्थळीच उभा राहिल्याने वाहतुकीलाही अडथळे निर्माण होतांना दिसले. काही संधीसाधू व्यक्ती मध्यस्थांची भूमिका निभवून ट्रकमालकाशी साटेलोटे करतांना दिसत होते. पोलिसांनी निदान त्यांच्यात समेट तरी घडवून आणायला हवा होता, ही प्रतिक्रिया उपस्थितांमधून ऐकायला मिळत होती. पोलीस गेल्यानंतर त्याठिकाणी गायीच्या मालकाकडून जमलेल्या लोकांमध्ये व ट्रक मालकाकडून आलेल्या लोकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

घुगुस वरून वणी येथील लालपुलियाकडे जात असलेल्या ट्रक क्र. MH ३४ BG ५३०३ ने रस्ता ओलांडणाऱ्या गायीला चिरडल्याने ती जागीच ठार झाली. सुनंदा गोंडे यांच्या मालकीची ही दुभती गाय असून सुसाट वेगाने येणाऱ्या ट्रकचा ती बळी ठरली. ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला. ट्रक मालक व गाय मालक यांच्यात सुरुवातीला वाद रंगल्यानंतर समजदारीचा पर्याय म्हणून भरपाईची मागणी करण्यात आली. ७० हजारापासून सुरु झालेली भरपाईची मागणी ४० हजारा पर्यंत रेटली गेली. मात्र ट्रकमलक आखरी १५ हजारांवर अडल्याने वाद वाढतच गेला. काही संधीसाधू व्यक्ती मूळ मालकाला दूर ठेऊन स्वतःच ट्रकमालकाशी साटेलोटे करतांना दिसत होते. रोडवरच त्यांचा उभा धिंगाणा सुरु असल्याने येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती त्याठिकाणी उभा राहून गर्दी वाढवतांना दिसत होता. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते. गायीची छिन्नविछिन्न झालेली अवस्था पाहून प्रत्येक व्यक्ती एकच प्रश्न विचारात होता, ट्रक चालकावर कार्यवाही झाली काय, उपस्थितांकडून एकच उत्तर मिळत होते अजून नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share