विठ्ठलवाडी येथील रस्ता दुरुस्तीचे काम अगदी संगतीने सुरु
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना लॉकडाउन काळात बंद असलेली रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची कामे लॉकडाऊन मधून शिथिलता मिळताच पावसाळ्याच्या तोंडावर सुरु करण्यात आली. शहरात रस्ते सौंदर्यीकरण व रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्याचबरोबर भूमिगत गटारांची कामेही अनेक मोहल्ल्यांमधे सुरु आहेत. पावसाळ्याच्या अगदी तोंडावर सुरु करण्यात आलेली ही विकास कामे अगदीच संथ गतीने सुरु असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील तीन महिन्यांपासून विठ्ठलवाडी येथील प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम सुरु आहे. बाजारपेठेकडे जाणारा हा प्रमुख रास्ता असून या रस्त्यावर हार्डवेयर, किराणा दुकान, बिछायत केंद्र, डेली नीड्स, जनरल स्टोर आदी दुकाने आहेत. हा रास्ता पूर्णतः खोदण्यात आल्याने नागरिकांना गल्लीबोळातून मार्ग काढतांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ता खोदल्याने याठिकाणी खळगे निर्माण होऊन पाणी साचल्याने रस्त्याच्या आजूबाजूला निवासस्थाने असलेल्या लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. चिखलमय झालेल्या या रोडवरून मार्ग काढतांना दुचाकी स्लिप होऊन पडल्याने नागरिकांना जख्मा झाल्या आहेत. जुलै महिन्यात पावसाने उसंत दिली असतांनाही पाहिजे तसा कामाचा वेग दिसून आला नाही. आता तर पावसात कामच बंद आहे. आणी पावसाळा आणखी दिड महिना राहणार असल्याने काम किती दिवसात पूर्ण होईल याची शाश्वती नसल्याने विठ्ठलवाडी येथील रहिवासी प्रशासनाकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.
विठ्ठलवाडी येथून व्हाया एस बी लॉन मार्गे वणी वरोरा रोडवर निघणाऱ्या प्रमुख रस्त्याचे मागील तीन महिन्यांपासून दुरुस्तीकरणाचे काम सुरु आहे. आमदार खासदार यांच्या विकास निधीतून सुरु असलेले रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम लॉकडाऊन मधून शिथिलता मिळताच पावसाळ्याच्या तोंडावर चालू करण्यात आले. रस्ता पूर्णतः खोदण्यात आल्याने विठ्ठलवाडीवासीयांना बाजारपेठेत व नोकरी कामांवर जाण्याकरिता गल्लीबोळातून मार्ग काढावा लागत असल्याने त्यांचा चांगलाच मनस्ताप होत्यांना दिसत आहे. खोदलेल्या रस्त्यांवर पाण्याचे खळगे साचल्याने नागरिकांचे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. दवाखान्यात जाण्या करीता व किराणा धान्य आणण्याकरिता ऑटो सुद्धा उपलब्ध होत नसून ऑटोवाले याठिकाणी तयार झालेल्या चिखलामुळे ऑटो नेण्यास साफ नकार देतात. पावसाळ्यात साथीचे रोग बळावत असतांना खोदकामामुळे निर्माण झालेल्या खाचखळग्यांमुळे याठिकाणी नेहमी पाणी साचून राहात असल्याने साथीचे रोग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातल्यात्यात ऑटो येथे येण्यास नकार देत असल्याने दवाखान्यात जाण्यायेण्याच्याही अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकूणच रोडच्या दुरुस्तीकरणाचे काम संथ गतीने सुरु असल्याने येथील नागरिक कमालीचे संतापले असून ते प्रशासनाकडे तक्रार देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.