दिवस उजाडला तरी विद्युत विभाग निद्रीस्थ अवस्तेतच, खांबावरील लाईट दिवसाढवळ्या सुरु !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी निद्रिस्त अवस्थेत असून दिवस उजडूनही विद्युत खांबावरील लाईट सुरु ठेऊन सूर्य प्रकाशाला कृत्रिम प्रकाशाची जोड देण्याचा प्रयत्न करीत करीत आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, कंपन्या व रेल्वे गाड्या बंद राहिल्याने मुबलक विद्युत साठा उपलब्ध असून दिवसरात्र विद्युत पुरवठा सुरु ठेवला तरी तो वर्षागणिक पुरेल हा स्थानिक विद्युत विभागाचा मानस झालेला दिसत आहे. घरगुती विजेचे दर भरमसाठ वाढविल्याने एकही अतिरिक्त लाईट सुरु ठेवण्याची नागरिकांची हिंम्मत होत नसतांना रोडचे संपूर्ण लाईट दिवसाढवळ्या सुरु ठेऊन विद्युत विभाग नागरिकांच्या जख्मेवर मीठ चोळत आहे. विद्युत विभागाने दिवसरात्र खांबावरील लाईट सुरु ठेवले तरी त्यांना कसल्याही प्रकारचे वीजबिल अदा करावे लागत नसल्याने अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. कोरोनाच्या संकटात नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली असतांना वीजवितरण विभागाने अवाढव्य वीजबिले नागरिकांच्या माथी मारून त्यांचं कंबरडचं मोडलं व मोडणं सुरूच आहे. कोरोना काळातील वीजबिल कमी करण्याचा निर्णय अधांतरीचं पडला आहे. नुसत्या आश्वासनांच्या खैराती वाटण्यात आल्या. आता "रात गायी बात गयी" सर्व चूप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज दिवस उजाडला तरी विद्युत विभाग मात्र कुंभकरणी झोपेत असल्याचे पाहायला मिळाले. सूर्यप्रकाशातही कृत्रिम प्रकाशाची जोड पाहायला मिळत होती. विद्युत विभागाने स्ट्रीट लाईट दिवसरात्र सुरु ठेऊन मुबलक असलेला विद्युत साठा जलद खर्ची करण्याचे धोरण अवलंबल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे संकटाच्या काळात अवाजवी वीजबिले नागरिकांच्या माथी मारल्या जातात तर दुसरीकडे दिवसाढवळ्या खांबावरील लाईट सुरु ठेऊन वीजसाठा मुबलक असल्याचे दर्शवितांनाच सामान्य जनतेला मात्र आम्ही वीजबिलातून सूट देणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिल्या जात आहे. उद्योग, कारखाने, कंपन्या व रेल्वे वाहतूक बंद राहिल्याने विजेचा साठा मुबलक असतांनाही सामान्य जनतेला या संकटाच्या काळात जराही वीजबिलातून सूट देण्यात आली नाही, हे त्यांना एकप्रकारे हिणवल्या सारखे झाले आहे. शासनानेही वीजबिल कमी करण्याचा निर्णय अधांतरीच ठेवला आहे. निवडणूक काळातच सामान्य जनतेविषयी कळवळा दाखविल्या जात असल्याचे आता नागरिकांनाही कळून चुकले आहे. घरगुती वीज दरांमध्ये भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना विजेचा वापर करतांनाच धास्ती भरत आहे. कितीही काटकसरीने वीजेचा वापर केला तरीही वीजबिल आवाक्याबाहेरचेच येत असल्याने सामान्य जनतेत वीजबिला विषयी संभ्रम निर्माण झाला असून विजेचा वापर आता करावा तरी कसा, हेच त्यांना कळेनासे झाले आहे. एकीकडे विजेचा वापर करतांना सामान्य जनता धास्तावली असतांना दुसरीकडे दिवसाच्या उजेडातही खांबावरील लाईट सुरु ठेऊन स्थानिक विद्युत विभाग विजेच्या मुबलक साठ्याची प्रदर्शनी करतांना दिसत आहे.