WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना रुग्णांची वाढ संत गतीने सुरु, आज १० कोरोना बाधित रुग्ण आढळले ! रेल्वे विभागात कोरोनाचा शिरकाव !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असली तरी एका दिवसात अवाढव्य संख्येने आढळणारे रुग्ण कमी झाले आहेत. मागील तीन चार दिवसांपासून कोरोना संक्रमणाची गती मंदावल्याने पाहायला मिळत असून रुग्णसंख्येचा आलेखही धिम्यागतीने वाढतांना दिसत आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येतांना दिसत असून आज १० कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५०३ वर पोहचला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२१ वर आली आहे. रुग्णसंख्येने ५०० चा टप्पा पार केला असून झटपट रुग्णवाढीनंतर आता हळुवार रुग्णवाढ होतांना दिसत आहे. आज आणखी ३५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ३७१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे.

दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून काही दिवस मोठ्या संख्येने आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. झपाट्याने होणारी रुग्णवाढ आता संत गतीने होतांना दिसून येत आहे. रुग्णांची संख्या मंदावल्याने प्रशासनावरील दडपण काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य प्रशासनानेही रुग्णसेवेत कसलीही दिरंगाई न करता रुग्णांना योग्य त्या सेवा पुरविल्या आहेत. आरोग्य सेवक व आशा सेविका शहरातील संपूर्ण परिसर पिंजून काढत नागरिकांची आरोग्य विषयक चौकशी करून त्यांची थर्मल स्कॅनिंग तपासणी करतांनाच त्यांना कोरोना विषयक मार्गदर्शन करतांना दिसत आहे. शहर प्रशासन व आरोग्य प्रशासनाचे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता अथक प्रयत्न सुरु असून प्रशासनामार्फत वेगवेगळ्या उपाययोजनाही करण्यात येत आहे. आज १७ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ७ पॉझिटिव्ह तर १० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच १३ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून ३ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १० व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १४ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १२१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. आज १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५०३ झाली असून ३७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२१ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २८ रुग्ण कोविड सेंटरला भरती असून ६६ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १७ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ब्राह्मणी येथील एक, चिखलगाव एक, विठ्ठलवाडी एक, रजा नगर एक, सिंदी कॉलनी एक, विराणी टॉकीज परिसर दोन, जैताई नगर दोन तर सर्वोदय चौक येथील एका रुग्णाचा समावेश आहे. विठ्ठलवाडी येथील रुग्ण वाढतच असून याठिकाणी २० रुग्णांची नोंद झाली आहे. विठ्ठलवाडी येथील रेल्वे कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला असून तो माजरी येथे कार्यरत होता. त्यामुळे आता रेल्वे विभागातही कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून त्याची प्रकृती ठीक नसल्याने तो सुट्या घेण्याकरिता डिपार्टमेंटमध्ये गेला असता त्याला अधिकाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्यानुसार त्याने पळसोनी कोविड केंद्रात चाचणी केली असता आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बांधकाम ठेकेदारांचा मुलगा असलेला रेल्वे कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने विठ्ठलवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रजानगर येथे पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share