WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोलिसांच्या समय सूचकतेमुळे अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यातील वांजरी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या बेतात असलेल्या घोन्सा येथील दोन तरुणांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोवळ्या वयातील मुलींना प्रेम पाश्यात अडकवून त्यांना फूस लावून पळऊन नेण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. पोलिसांनी समय सूचकता दाखवून पेट्रोलिंग दरम्यान नांदेपेरा रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळ दोन तरुण व एक तरुणी दुचाकीवरून जात असतांना त्याची चौकशी केली असता उत्तरे संशयास्पद आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असता सदर मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोन्ही आरोपींवर अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात येत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांजरी येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीचे वडील प्रवीण तात्याजी बोरे (४५) रा. वांजरी यांनी १७ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास वणी पोलीस स्टेशला नोंदविली. दरम्यान पोलिसांची वणी यवतमाळ रिंग रोडवर गस्त सुरु असतांना दोन तरुण व एक तरुणी दुचाकीवरून संशयास्पद स्थितीत जातांना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना रोखून त्यांची चौकशी केली असता उत्तरे देतांना त्यांची भंबेरी उडत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पोलीस स्टेशनला वांजरी येथील मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असल्याचे निदर्शनास आल्या नंतर पोलिसांनी दोन्ही तरुणांना पोलिसी खाक्या दाखवला असता तरुणांनी मुलीला पळवून नेत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी कुणाल विलास देवतळे (१९) व गौरव मनोहर कार्लेकर (२०) दोन्ही रा. घोन्सा यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना भूलथापा देऊन पळवून नेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. १५ ऑक्टोबराला रंगनाथ नगर येथील अल्पवयीन मुलगी अशीच अचानक बेपत्ता झाल्याने तिचा शोध सुरु आहे. पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या मुला मुलींकडे विशेष लक्ष देणे आता जिकरीचे झाले आहे. वयातील आकर्षण पालन पोषणावर वरचढ ठरत असल्याचे दिसून येत आहे. वयात येणारी तरुण पिढी बेभान तर पालकवर्ग हैराण झाला आहे. शिक्षण घेणारी कोवळ्या वयातील मुले आकर्षनाला बळी पडून चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत. पालकांच्या डोळ्यात अंजन घालून शाळेत जाण्याच्या नावावर पळून जाण्याचे कारस्थान रचण्यात येत आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज कोवळी मुले चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखल्या गेली.

पुढील तपास पी एस आय प्रताप बाजड करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share