WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सदभाव कंपनीने वेतन न दिल्याने कामगार गेले संपावर, तीन दिवसांपासून कंपनीचे काम बंद

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

दिवाळी सुरू होऊनही सदभाव प्रा. लि. कंपनीतील कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्याने सणासुदीच्या दिवसातही त्यांचे हात रितेच राहिले आहेत. पगाराचा पैसा हातात न आल्याने दिवाळी सारखा सन ओवाळणी घालून जात असल्याची खंत त्यांच्या जिव्हारी लागली आहे. सदभाव कंपनीच्या वेळकाढू धोरणामुळे दिवाळीचे दिवस उलटूनही पगाराची रक्कम कामगारांच्या खात्यात वळती न झाल्याने कामगार नैराशेच्या गर्तेत आले असून त्यांच्यामध्ये कंपनी विषयी असंतोष खदखदू लागला आहे. पैशाअभावी दिवाळीची खरेदी करता न आल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी अखेर काम बंद करून आपली उद्विग्नता मांडण्याकरिता मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. राजू उंबरकर यांच्याकडे सदभाव कंपनीने केलेल्या अन्यायाचा पाढा वाचून मदतीची याचना केली. राजू उंबरकर यांनी कामगारांचे सांत्वन करीत पुरेपूर सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील कोलारपिंपरी खदानीशी निगडित असलेली सदभाव प्रा. लि. ही कंपनी कोलार खाणीचे विस्तारीकरण करण्याच्या करारावर आली आहे. गत वर्षी ही कंपनी अंतर्गत प्रकारणांनी चांगलीच चर्चेत आल्याने या कंपनीने आपल्या करारावर एस.के. खेतान कंपनीकडे खदान विस्तारीकरणाचे काम सोपविले. कंत्राट सदभाव कंपनीचे असून काळजीवाहू म्हणून खेतान कंपनीकडे कामकाज देण्यात आले आहे. या कंपनीमध्ये ७०० ते ८०० कर्मचारी काम करतात. या कंपनीच्या इन्चार्ज कडून नेहमी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची खंत कामगारांनी व्यक्त केली आहे. मराठी कामगारांना दुय्यम वागणूक दिल्या जात असल्याचेही कामगारांमधून ऐकायला मिळत आहे. पहिल्या महिन्याचा पगार दुसऱ्या महिन्याच्या २७ ते ३० तारखे दरम्यान देण्यात येतो. पगाराची तारीख निश्चित नसल्याने दैनंदिन वस्तूंच्या बिलांचे पैसे चुकविताना नेहमी कामगारांना अडचणी येत असतात. याही परिस्थितीशी कामगारांनी जुळवून घेत कंपनी व्यवस्थापनाकडे कधीही नाराजी व्यक्त केली नाही. पण या महिन्यात दिवाळी सारखा महत्वाचा सन असल्याने कामगारांनी या महिन्याचा पगार दिवाळी आधी करण्याची व्यवस्थापनाकडे गळ घातली होती. व्यवस्थापनाने कामगारांना भूलथापा देत वेळ मारून नेली. पगार न देता त्यांची फक्त बोळवण करण्यात येत असल्याचे कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी काम बंद करून कंपनीकडे पगाराकरिता तगादा लावला. पण कंपनी याही परिस्थितीत पगार देण्यास तयार होत नसल्याचे पाहून कामगारांनी मनसेचे राजू उंबरकर यांच्याकडे धाव घेतली. राजू उंबरकर यांनी कामगाच्या व्यथा जाणून घेत त्यांना पुरेपूर सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. सदभाव कंपनीत कामगारांवर होत असलेल्या अन्यायाची दखल घेत काही दिवसांआधी राजू उंबरकर यांनी कंपनीच्या इन्चार्जला चांगलाच चोप दिला होता. तरीही कंपनीने कामगारांवरील अन्याय सुरूच ठेवला आहे. दिवाळी सारख्या सणाला कामगारांना वेतनापासून वंचित ठेऊन सदभाव कंपनीने त्यांच्या आनंदावर विरजण आणले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share