साईकृपा जिनिंगला लागलेल्या आगीत लाखोंचा कापूस जाळून खाक
वणी निळापूर रोडवरील साईकृपा जिनिंगला काल २७ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जाळून खाक झाला. शॉर्टसर्किटमुळे ठिणगी उडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरवीत जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीकरिता आणला जात असून शेतकऱ्यांचा कल खाजगी कापूस खरेदीदारांकडे झुकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खाजगी कापूस खरेदीदारांकडे कापसाची आवक वाढली आहे.
सीसीआय ची कापूस खरेदी वेळाने सुरु झाल्याने तसेच सीसीआय व खाजगी कापूस खारेदारांच्या भावामध्ये जास्त फरक नसल्याने कास्तकारानी डोकेदुखी न पाळता खाजगी कापूस केंद्रावरच कापूस विक्रीला पसंती दिली आहे. सीसीआयने ५ हजार ८२५ रुपये प्रतिटन भाव वाढला असून खाजगी कापूस केंद्रावरही ५ हजार ४०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्याने कास्तकार खाजगी कापूस खरेदीदारांकडेच कापूस विक्रीकरिता नेत आहेत. परतीच्या पावसाने केलेला कहर व बोन्ड अळीने केलेल्या आक्रमणामुळे तसेही कापसाचे उत्पन्न नाहीच्या बरोबर झाले असून सीसीआय कापसाचा दर्जा ठरवितांना अन्याय करीत असल्याची भावना निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. जिनिंगमध्ये कापसाची आवक वाढल्याने कापसाची छाननी करणे सुरु असून मशीनमध्ये दगड आल्यास त्यातून उडणाऱ्या ठिणग्यांनी आग पकडण्याची शक्यता असते. साईकृपा जिनिंगमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जाळून खाक झाला असून अंदाजे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.