निसर्गकोप व रोगराईने शेतपिकांवर आली संक्रांत, शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर चालविला नांगर
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
रोगराई आणी संकटं घेऊन आलेल्या या वर्षाने साऱ्यांनाच अडचणीत टाकले आहे. प्रत्येकांसाठीच हे वर्ष दुर्दैवी ठरलं आहे. कोरोनाच्या आजारानं सर्वानाच बेजार करून सोडलं आहे. कोरोनामुळे व्यापार, उद्योगांना फटका बसला तर निसर्गकोप व रोगांमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी देशोधडीला आला आहे. लॉकडाऊनमुळे शेतीची पार वाताहत झाली. लॉकडाऊन काळात मजूर व बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने शेतमाल शेतातच सडला. तर काही शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर नांगर फिरवावा लागल्याने शेतकरी नैराशेच्या गर्तेत आला. तरीही हिंमत न हारता नव्या हंगामात नव्या दमाने शेती कसून योग्य उत्पादनाची आस लावून असलेल्या शेतकऱ्यावर निसर्गाची अवकृपा झाली व हातातोंडाशी आलेले कपाशीचे पीक नेस्तनाभूत झाले. आधी परतीच्या पावसाने कहर केल्याने कपाशीची बोंडं गळून पडली तर नंतर बोण्ड अळीने आक्रमण करून कपाशीचे पीक उध्वस्त केल्याने शेतकरी चांगलाच संकटात आला आहे. कीटक नाशकांची फवारणी करूनही बोण्डअळीचा प्रादुर्भाव कमी होणार नाही हे लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी उभ्या कापसाच्या पिकांवर नांगर फिरविने सुरु केले आहे. लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस पिकावर टॅक्टर व रोटावेटर फिरवून आपला संताप व्यक्त केला आहे.
तालुक्यातील निळापूर येथील शेतकरी रितेश शंकर ठाकरे यांनी सहा एकरात लागवड केलेल्या कपाशीच्या उभ्या पिकावर नगर फिरवला तर वांजरी येथील शेतकरी राजू रामन्ना दासरी या शेतकऱ्याने तर आपल्या वीस एकर शेतात पेरणी केलेल्या कपाशीच्या पिकावर नांगर फिरवून संताप व्यक्त केला. सुरुवातीला बोगस बियाणे आणी सततच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक मातीमोल झाले. त्यानंतर कपाशीवरही गुलाबी बोंड अळीचा प्रकोप वाढल्याने बोंड सडून गळू लागली. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली. सोयाबीन व कपाशीच्या पिकातून लावलेला खर्चही निघणे अशक्य झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरविणे सुरु केले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी अल्पवृष्टी, कधी रोगराई तर कधी शेतमालाला मिळणारा अल्पभाव, या संकटांनी नेहमीच शेतकरी घेरलेला असतो. निसर्गाचा कोप विषाणूंचा प्रकोप या दुहेरी संकटाने होरपळून निघालेला शेतकरी शासनाच्या मदतीची आस लावून बसला आहे. शेतकऱ्यांना नेहमीच अपेक्षेच्या ओंजळीत नैराशेचं मिळतं. शेतीच्या मशागतीपासून तर पिकांचं संगोपन करण्यापर्यंत लाखो रुपयांचा खर्च होत असताना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीने शेतमालाचे नुकसान झाल्यास तुटपुंजी मदत देण्यात येते. त्यामुळे शेतकरी कधीच कर्जमुक्त होताना दिसत नाही. बोगस बियाणं व परतीच्या पावसानं सोयाबीनचं पीक हातचं गेलं, बोन्ड अळीने कपाशीचं पीक उध्वस्त केलं तर आता ढगाळ वातावरणाने तुरीवरही किडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर पुन्हा नव्या संकटाची गडद छाया निर्माण होताना दिसत आहे.
तालुक्यातील वांजरी येथील राजू रामन्ना दासरी यांनी दहा एकरात सोयाबीनची लागवड केली तर १८ एकरात कपाशीची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन नाहीच्या बरोबर झाले तर परतीचा पाऊस व बोन्ड अळीने कपाशीचे पीकही नेस्तनाभूत केले. १८ एकरात लावलेल्या कापसाच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवावा लागल्याने राजू दासरी यांचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कपाशीच्या पिकातून लावलेला खर्चही निघणे अवघड झाल्याने शेतकऱ्यांनी उभी पिकं नांगरून टाकली आहेत. पेरणी करीता लावलेला खर्च व अनेक वर्ष घेतलेल्या परिश्रमावर पाणी फेरल्या गेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवून १८ एकरातील कपाशी उपटून फेकली.