WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महापरिनिर्वाण दिनी महामानवाला केले अनेक अनुयायांनी अभिवादन, त्यांच्या मौलिक विचारांना दिला उजाळा !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त शेकडो अनुयायांनी त्यांच्या पुतळ्यास हारार्पण करून व श्रद्धांजली वाहून अभिवादन केले. बहुजन समाजातील अनेक मान्यवरांनी या महामानवाला आदरांजली वाहून मानवंदना दिली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. तर ठाणेदार वैभव जाधव यांनीही महामानवाला आदरांजली वाहिली. सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महामानवाच्या स्मृतीस अभिवादन केले. सकाळ पासूनच महामानवाला अभिवादन करण्याकरिता अबालवृद्ध, महिला व पुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ जमले होते. भारतीय बौद्ध महासभा सभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सकाळी ९.३० वाजता अनेक मान्यवरांनी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानिमित्त त्रिशरण पंचशील घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला.

६ डिसेंबर १९५६ ला बहुजनांचा कैवारी सर्वाना पोरका करून निघून गेला. संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या कल्याणाकरिता वाहून घेतानाच सर्वाना सामान न्याय व हक्क मिळवून देण्याकरिता अख्ख आयुष्य त्यांनी खर्ची घातलं. समाजाला आधुनिक जगाशी, त्याच्या आधुनिक समाज आणी राजकीय व्यवस्थेशी, त्यांच्या आधुनिक जीवनमूल्यांशी संवादी बनवायचे होते. त्यासाठी पोषक असे वैचारिक वास्तव निर्माण करायचे होते. त्या मागील अडथळ्यांचा अचूक वेध घ्यायचा होता. तसा तो त्यांनी प्रदीर्घ अभ्यासातून आणी चिंतनातून घेतला. संसदीय लोकशाहीच्या मार्गाने समाजवादी समाजरचनेची स्थापना करणे हे बाबासाहेबांच्या राजकीय विचारांचे सूत्र होते. आणी राज्यघटना समाजवादी अर्थव्यवस्थेला घटनात्मक विधिनियमांचा दर्जा देणारी असावी असा त्यांचा आग्रह होता. "भारत हा टोकाचा लोकशाही विरोधी देश आहे. त्यात लोकशाही यशस्वी व्हायची असेल, तर प्रादेशिक मतदारसंघ आणी स्वतंत्र मतदारसंघ ही दोन्ही टोके टाळून येथे राखीव जागांसह संयुक्त मतदारसंघच स्थापन करून सुवर्णमध्य साधला पाहिजे" अशी त्यांची मूळ भूमिका होती.

खालच्या जाती शेकडो वर्षे अज्ञानात चाचपडत राहिल्या. त्यांच्या नशिबी गुलामीचे जीवन आले. त्यातून असे सामाजिक संकेत, चालीरीती, प्रथा व मूल्ये निर्माण करण्यात आले की, त्यातून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विषमताच कायम राहिली. त्याचा परिणाम या देशातील करोडो लोकांच्या ठिकाणी श्रमशक्ती असूनही त्याचा योग्य उपयोग करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे हा देश सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्टीने मागासलेला राहिला. या देशातील परंपरांनी दारिद्रयाचे उदात्तीकरण केले आहे. ज्यामुळे आर्थिक विकासाची प्रेरणाच नष्ट केली आहे. या देशातील ग्रामीण व्यवस्थेने परंपरागत समाज व्यवस्थेला मजबूत केले आहे. जमीनदारी प्रथेने खालच्या वर्गाचे आर्थिक शोषण प्रचंड प्रमाणात केले आहे. भारतातील ग्रामीण जीवनात उच्च जाती व मागासलेल्या जातीमध्ये सतत संघर्ष असतो. आजही स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर त्यात फारसा बदल झाला नाही. भारतीय समाजाचा दुसरा शत्रू म्हणून त्यांनी भांडवलशाहीला प्रखर विरोध केला. भांडवलशाही ही खाजगी संपत्तीवर उभी असून त्याचा परिणाम म्हणून उत्पादनाची सर्व साधने धनिकांच्या हाती असतात. बहुसंख्य दलित , श्रमिक, शोषितांचे जीवन जगतात. ते साधनरहित असतात. देशातील जमीन उद्योग व्यापार व भांडवल इत्यादींवर धनिक लोकांचा ताबा असतो. दुसऱ्या बाजूला शारीरिक कष्टाची कामे करूनही समाजाचा मोठा वर्ग अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, प्राथमिक आरोग्य व शिक्षण यातून वंचित होऊ लागतो. या बाबासाहेबांच्या मौलिक विचारांची व तत्वांची यानिमित्ताने आठवण झाली. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या मौलिक विचारांना अनेक मान्यवरांनी उजाळा दिला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share