तालुक्यातील वागदरा येथील तरुण राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला
शहरा पासून जवळच असलेल्या वागदरा येथील ग्रामपंचायतच्या मागे राहणारा एक तरुण राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची खळबळ जनक घटना आज ७ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गुडघे जमिनीला टेकलेल्या स्थितीत तरुणाने गळफास घेतल्याचे आढळून आल्याने परिसरात अनेक चर्चांना उधाण आले असून घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. सुरज चिपडे असे या मृतक तरुणाचे नाव आहे. २० वर्षे वयोगटातील असलेला हा तरुण आई वडील शेतात गेल्याने एकटाच घरी असल्याचे समजते.
तालुक्यातील वागदरा येथील ग्रामपंचायतच्या मागे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबातील २० वर्षीय तरुण संशयास्पद स्थितीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली असून शंका कुशंकांना पेव फुटले आहे. परगावी राहणाऱ्या आपल्या आजारी नातेवाईकाला वडिलांसह भेटून आलेला तरुण राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दुपारी १.३० वाजता तो व त्याचे वडील चंद्रपूर येथे भर्ती असलेल्या आपल्या नातेवाईकाला भेटून आले होते. मुलाला आराम करण्यास सांगून वडील शेतात निघून गेले. तर आई आधीच शेतात जाऊन होती. सुरज हा एकटाच घरी असल्याचे समजते. आई सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शेतातून घरी आली असता तिला सूरज जमिनीवर गुडघे टेकलेल्या स्थितीत गळफास घेतल्याचे आढळून आले. दुपारी १.३० वाजता दोघेही बापलेकं चंद्रपूर वरून परत आल्यानंतर मुलाला आराम करण्यास सांगून वडील शेतात निघून गेले. दरम्यान सुरज दोस्त मित्रांबरोबर दूरध्वनी वरून बोलला असल्याचेही समजते. एकाएक त्याने गळफास का घेतला असावा ही एकच चर्चा सध्या गावात सुरु असून गुडघ्यांवर बसलेल्या स्थितीत गळफास घेतल्याचे आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.