तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन, ४११ प्रकरणे निकाली काढली तर ४ लाख रुपयांचा वसूल केला दंड !
तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात १२ डिसेंबरला राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येऊन त्यात ४११ फौजदारी प्रकरणाचा तातडीने निपटारा करण्यात आला. तसेच सर्व प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढून त्यातून चार लाख ११ हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लोकन्यायालयाच्या माध्यमातून फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात व दंड वसूल करण्यात वणी तालुका अग्रेसर असल्याचे सांगण्यात येत आहे.
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश के.के. चाफले यांच्या हस्ते करण्यात आले. लोकन्यायालयामध्ये प्रकरणाचा निपटारा करण्याकरिता दोन पॅनल तयार करण्यात आले. एका पॅनलचे प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश के.के. चाफले यांनी प्रकरणे हाताळली. तर दुसऱ्या पॅनलचे प्रमुख म्हणून न्यायाधीश एस.बी. तिवारी यांनी प्रकरणांचा निपटारा केला.
लोकन्यायालयामध्ये येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी प्रकारणांपैकी तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ४११ फौजदारी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून त्यातून चार लाख ११ हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकन्यायालयाच्या यशस्वीतेकरिता न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक व तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक आर.व्ही. बढिये, कनिष्ठ लिपिक एस.एस. निमकर तथा न्यायालयीन कर्मचारी व वकिलांनी सहकार्य केले.