इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचे धरणे आंदोलन
इंधन दरवाढीच्या विरोधात तालुका शिवसेनेच्या वतीने काल ५ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. माजी आमदार विश्वासराव नांदेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, तालुका प्रमुख रवी बोढेकर, चंद्रकांत घुग्गुल, संजय आवारी, शहर प्रमुख राजू तुरांकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. महागाईचा होत असलेला उद्रेक व शेतकरी विरोधी केंद्र सरकारच्या असलेल्या भूमिकेचा निषेध करीत शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने दिली.
पेट्रोल डिझलचे दर गगनाला भिडले असून गॅस सिलेंडरच्या किमतीतही भरगोस वाढ झाली आहे. सतत वाढत असलेल्या इंधन दरांमुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागली आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर होण्याच्या मार्गावर आहे. डिझलच्या किमतीतही बरीच वाढ झाली आहे. महागाईने सामान्य नागरिकांचं जगनं कठीण झालं आहे. महागाईचा भस्मासुर सामान्य नागरिकांना गिळंकृत करू पहात असतांना केंद्र सरकारचे त्यावर नियंत्रण राहिलेले नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने शेतकरी विरोधी भूमिका घेतली असून शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे इंधन दरवाढ व शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध करित तालुका शिवसेनेच्या वतीने काल ५ फेब्रुवारीला शिवाजी महाराज चौक येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करून केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने देण्यात आली.