जी.एस. ऑइल मिल मधील साहित्य चोरी प्रकरणी शहरातील भंगार व्यावसायिकास अटक
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
वणी भालर मार्गावरील जी.एस. ऑइल मिल कंपनी मधून करोडो रुपयांचे लोखंडी व इतर साहित्य चोरून हडप केल्या प्रकरणी पोलिसांनी शहरातील एका भंगार व्यावसायिकाला अटक केली आहे. सिंकरदराबाद येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांनी जी.एस. ऑइल मिल कंपनीमधून अज्ञात चोरटयांनी लोखंडी व इतर साहित्य चोरून नेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनला दाखल केली होती. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात कंपनी मधील साहित्य चोरीचा मास्टर माईंड शहरातीलच भंगार व्यावसायिक शेख इप्तेखार उर्फ बबलू शेख अहमद (४९) असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहे. काल १० फेब्रुवारीला त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भालर मार्गावरिल जी.एस. ऑइल मिल कंपनी कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने आपल्या ताब्यात घेतली होती. ही कंपनी सुरु करण्याकरिता बँक ऑफ इंडियाच्या आदिलाबाद शाखेतून २२० कोटी ९५ लाख रुपयांचे लोन घेण्यात आले होते. काही दिवस कर्जाची परतफेड केल्यानंतर कंपनीच्या संचालकांनी आर्थिक नुकसानीमुळे जुलै २०१२ पासून कर्जाचे नियमित हप्ते भरणे बंद केल्याने बँकेने आदिलाबाद व वणी येथील कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या. मनोजकुमार अग्रवाल उर्फ मखरीया हे या जी.एस. ऑइल मिल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. ही कंपनी बँकेच्या ताब्यात गेल्यानंतर कंपनी जवळ तैनात असलेले सेक्युरिटी गार्डही काढून घेण्यात आले. त्यामुळे चोरट्यांना रान मोकळे झाल्याने त्यांनी कंपनीच्या लोखंडी साहित्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली. गॅसकटरचा वापर करून कंपनीतील संपूर्ण लोखंडी साहित्यच चोरटयांनी लंपास केले. कंपनीची परवानगी मिळाल्यागत चोरटे दिवसाढवळ्या लोखंडी साहित्याची कटाई करून वाहनांमध्ये भरून लंपास करीत होते. कंपनीमधून लोखंडी साहित्य चोरी होत असल्याची माहिती कंपनीचे संचालक मनोज अग्रवाल उर्फ मखरीया यांना मिळताच त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. २ जानेवारी २०२० ला स्टेट बँक ऑफ इंडियाचे सिकंदराबाद शाखेचे व्यवस्थापक मुक्कटीश्वरराव संका (५५) यांनी जी.एस. कंपनीतील लोखंडी व इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनला नोंदविली होती. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि च्या कलम ३७९,३८०,४५२,४५७,३४ नुसार गुन्हा दाखल करून चोरी प्रकरणाचा तपास सुरु केला. ९ फेब्रुवारी २०१७ ते १० मार्च २०१८ या कालावधीत जी.एस ऑइल मिल कंपनीतील ११ कोटी २३ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे साहित्य लंपास केल्याची तक्रार करण्यात आली होती. या चोरीचा प्रमुख सूत्रधार शहरातीलच भंगार व्यवसायी शेख इप्तेखार उर्फ बबलू अहमद खान असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.