ट्रक चालकाकडे पैशाची मागणी करीत अपहरण सदृश्य कृत्य करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
शहरालगत असलेल्या लालपुलिया परिसरातून एका ट्रक चालकाला चौघा जणांनी जबरन कारमध्ये बसवून नेत पैशाची मागणी केल्याची तक्रार ट्रक चालकाने पोलीस स्टेशनला नोंदविली आहे. कारला साईड का दिली नाही म्हणत चौघा जणांनी ट्रक समोर गाडी आडवी करून ट्रक थांबविला व चालकाला मारहाण करीत ट्रकच्या काचा फोडल्या. ते चौघे एवढ्यावरच थांबले नाही तर त्याला दहा हजार रुपयांची मागणी करीत जबरन कारमध्ये बसवून त्याला राजूर फाट्याकडे घेऊन गेले. ही बाब ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला कळताच त्याने चौघा जणांना ढाब्याजवळ गाठत चालकाला सोडण्याची विनंती केली. परंतु त्या चौघांनीही १० हजार रुपये दे नाही तर जे करायचे ते करून घे, असे म्हणत चालकाला सोडण्यास नकार दिला. या प्रकरणाची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ट्रान्सपोर्टमधे काम करणाऱ्या व्यक्तीला सोबत घेत त्या अपहरण सदृश्य कृत्य करणाऱ्या चौघांनाही राजूरफाटा येथे गाठून चालकाची त्यांच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांना बघून त्यांच्यातील एक जण पळून गेला तर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे.
लालपुलिया येथील नॅशनल ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून कोलडेपो मधून कोळसा भरून सोलापूरला जात असलेल्या ट्रक क्रं MH २६ BE ४६४९ ला कारमध्ये आलेल्या चौघा जणांनी थांबवून कारला साईड का दिली नाही म्हणत ट्रक चालक बालाजी लहू पपलवार २२) रा. राळेगांव ता. लोहा जी. नांदेड याला मारहाण करून ट्रकच्या काचा फोडल्या. तसेच चालकाकडे १० हजार रुपयांची मागणी करीत त्याला जबरन कार क्रं MH ३१ FE ७७८८ मध्ये बसवून राजूर फाट्याकडे घेऊन गेले. ही बाब ट्रान्सपोर्टमधे ट्रक लावणाऱ्या वसीम जलील खान याला कळताच त्याने चौघांना ढाब्याजवळ गाठत चालकाला सोडण्याची विनंती केली. परंतु १० हजार रुपये दिल्याशिवाय चालकाला सोडणार नाही, असे म्हणत वासिमलाच त्या चौघांनी दम दिला. घाबरलेल्या वसीम जलील खान याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी राजूर फाटा येथे जाऊन त्या चौघाही खंडणी बहाद्दरांच्या तावडीतून ट्रक चालकाची सुटका करीत आरोपीना अटक केली. राजूर येथे राहणारे मनोज मोती कश्यप (२५), सन्नी दिपक राजनलवार (३१), क्रिष्णा विनोद सिंग (२६) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३६५, ३८५, ४२७, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना पाहून हरिकेश यादव हा पळून गेला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
बाहेरगावांवरून वणी येथे आर्डर नुसार कोळसा भरण्याकरिता येणाऱ्या ट्रक चालकांना धाकदपट करून पैसे उकळण्याचे धंदे लालपुलिया येथे सुरु आहे. अकारण ट्रक चालकांना त्रास देऊन पैशांची मागणी केली जात आहे. लांब टप्प्यावर चालणाऱ्या ट्रक चालकांकडे भरपूर पैसे असतात ही काहींची धारणा झाली असल्याने ते करणे शोधून धाकदपट करून या ट्रक चालकांकडून पैसे उकळून आपले शौक पूर्ण करतात. अशा अपप्रवृत्तींना आवर घालणे गरजेचे झाले आहे.