अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने केला अत्याचार, राजूर कॉलरी येथील संतापजनक घटना !
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यातील राजूर कॉलरी येथील अल्पवयीन मुलीवर त्याच गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना काल २० फेब्रुवारीला उघडकीस आली. याबाबत मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त मुलाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
राजूर कॉलरी येथील अल्पवयीन मुलगी १९ फेब्रुवारीला आई वडील कामाला गेल्यानंतर घरून निघून गेली. रात्री उशिरा पर्यंत ती घरी न परतल्याने तिचा सर्वत्र शोधाशोध घेण्यात आला. परंतु तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारीला सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावातीलच एका व्यक्तीने तिला वेकोलिच्या क्लब ग्राऊंडकडे जातांना पाहिल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. कुटुंबीयांनी क्लब ग्राऊंडकडे धाव घेत क्लब ग्राउंड परिसरात मुलीचा शोध घेणे सुरु केले. तेथे ती भेजारलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला कुटुंबीयांनी विश्वासात घेऊन रात्रभर कुठे होती, अशी विचारणा केली असता तिने गावातीलच एका मुलाने तिला याठिकाणी बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचे कुटुंबियांना सांगितले. मुलीची आपबिती ऐकून मुलीचे आई वडील चांगलेच हादरले. मुलीच्या आईने तत्काळ मुलीला घेऊन वणी पोलीस गाठले. गावातीलच अल्पवयीन मुलाने आपल्या मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत विधिसंघर्षग्रस्त मुलाला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३६३, ३७६(३) व सहकलम ४,६ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करीत आहे.