डिझलच्या वाढत्या किमतीमुळे कोळसा वाहतूकदार आले अडचणीत

सतत वाढणाऱ्या डिझलच्या किमतीमुळे वाहतूकदार वर्ग चांगलाच चिंतेत आला आहे. डिझलचे दर भरमसाठ वाढले असतांना माल वाहतुकीचे दर मात्र जैसे थे च असल्याने वाहतूकदारांचे गणित बिघडले आहे. मागील काही दिवसांत डिझलच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्या तुलनेत माल वाहतुकीचे दर अत्यल्प असल्याने वाहतूकदारांच्या मिळकतीत कमालीची घट झाली आहे. तालुका हा कोळसा खदानींनी वेढलेला असल्याने याठिकाणी कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. कोळसा खदानींमधून ट्रकने रेल्वे सायडिंगवर कोळसा आणला जातो. वेकोलीच्या मुख्य कार्यालयातून कोळसा खदानींचे कोळसा वाहतुकीचे कंत्राट निघाल्यानंतर ज्या वाहतूकदाराचा वाहतुकीचा दर सर्वात कमी असेल त्याला कोळसा वाहतुकीचे कंत्राट दिले जाते. कोळसा वाहतूक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढल्याने मोठे वाहतूकदार स्पर्धेत टिकून राहण्याकरिता मोजक्या दरात कोळसा वाहतुकीचे कंत्राट घेतात. मोठ्या वाहतूकदारांकडे स्वतःच्याच भरमसाठ गाड्या रहात असल्याने ते इतरांच्या गाड्या लावण्यात असमर्थता दर्शवतात. गाड्या लावण्यास तयारही झाले तरी माल वाहतुकीचा दर वाहतुकीला परवडणार नाही अशा प्रकारचा असल्याने छोटे वाहतूकदार चांगलेच अडचणीत आले आहेत. डिझलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असली तरी माल वाहतुकीचे दर मात्र दहा वर्षा आधीचेच असल्याने छोटे वाहतूकदार नैराशेच्या गर्तेत आले आहेत. कोळसा वाहतूक व्यवसायात दम राहिला नसल्याने कित्येकांनी या व्यवसायातून माघार घेतली आहे. तर कित्येक माघार घेण्याच्या तयारीत आहेत.
तालुक्यात अनेक कोळसा खाणी असल्याने येथे कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. कोळसा खाणी मधून रेल्वे सायडिंगवर तथा कोल डेपोंमध्ये ट्रकने कोळसा आणला जातो. कोळसा वाहतूकदारांमध्ये परप्रांतीयांचा जास्त भरणा असून कोल ट्रान्सपोर्टींग व्यवसायात त्यांचीच मक्तेदारी राहिली आहे. काही स्थानिक लोकांनी व बेरोजगार तरुणांनी कालांतराने कोल ट्रान्सपोर्ट क्षेत्रात उडी घेतली. काही स्थानिक लोकांनी या व्यवसायात जम बसवला तर काहींनी या व्यवसायातून फारकत घेतली. ज्यांनी जम बसविला त्यांनी स्वतःचेच भले करण्यात धन्यता मानली.
आता या व्यवसायात हवी तेवढी मिळकत राहिली नसल्याने अनेक जण या व्यवसायातून माघार घेतांना दिसत आहेत. कोळसा वाहतुकीचे कंत्राट निघाल्यास वाहतूकदार एकमेकांशी समन्वय न साधता आपल्या परीने अत्यल्प दर टाकून कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न करतात. वाहतूकदारांच्या स्पर्धेमध्ये वेकोलिचे चांगलेच फावते. अल्प दर टाकलेल्या वाहतूकदाराला कंत्राट मिळतं खरं पण जेंव्हा बेरीज वजाबाकी केल्या जाते तेंव्हा बचत अगदीच कमी होत असल्याचे पाहून कंत्राटदार विचारात पडतो. परिणामी छोटा वाहतूकदार यात भरडल्या जातो. त्याला नाईलाजास्तव अतिशय कमी दरात कंत्राटदाराकडे गाडी चालवावी लागते. त्यातून त्याला आवश्यक तेवढीही बचत होत नसल्याने छोटा वाहतूकदार आर्थिक अडचणीत आला आहे. गाडीची ईएमआय, इन्शुरन्स, टॅक्स, फिटनेस व इतर खर्च या अत्यल्प मिळकतीतून भागविणे अतिशय अवघड झाल्याने वाहतूकदार कोल ट्रांसपोर्टींग क्षेत्रातून काढता पाय घेत आहेत. सतत वाढणाऱ्या डिझलच्या किंमती व कोळसा वाहतूकदाराला मिळणारे वाहतुकीचे अत्यल्प दर छोट्या वाहतूकदारांना वाहतूक व्यवसायातून बाद करीत आहेत. कोल ट्रान्सपोर्टींग क्षेत्रातील वाढती स्पर्धा कोळसा वाहतूकदारांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे. त्याचप्रमाणे डिझलच्या वाढत्या किमतींनी कोळसा वाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे.