फोनकॉल करून तरुणीवर प्रेम लादू पाहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक
तालुक्यातील भुरकी येथील अठरा वर्षीय तरुणीवर वाईट नजर ठेवणाऱ्या त्याच गावातील २१ वर्षीय तरुणाला तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीच्या घरी असलेल्या चारचाकी वाहनावर काही वर्षांपूर्वी चालक असलेला तरुण तिला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तिच्यावर स्वतःचे प्रेम लादण्याचा प्रयत्न करतांनाच तिचे फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी देत होता. तरुणीने याबाबत त्याला जाब विचारला असता त्याने माझे तुझ्यावर प्रेम असून तू माझ्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाही तर मी तुझे फोटो फेसबुकवर टाकीन व तुझे कुठेही लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. ही बाब तिने आपल्या आई वडिलांना सांगितली. मुलीच्या आईने मुलीसह पोलीस स्टेशनला येऊन मुलीला नाहक त्रास देणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत त्वरित आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील भुरकी येथील एका परिवाराकडे चार वर्षांपूर्वी चालक म्हणून कामाला असलेल्या शंकर सुधाकर देऊळकर (२१) रा. भुरकी याने त्याच परिवारातील तरुणीवर वाईट नजर ठेवत तिला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून प्रेमाच्या वाल्गना करीत नाहक त्रास देणे सुरु केले. मागील दिवाळीपासून फोनकॉल करणाऱ्या तरुणाला प्रतिसाद न देता तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण २६ फेब्रुवारीला सदर तरुणाने तरुणीच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून तिचे फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी दिली. तरुणीने याबाबत त्याला जाब विचारला असता त्याने स्वतःचे प्रेम तिच्यावर लादण्याचा प्रयत्न केला. तरुणीने ही गंभीर बाब आपल्या आई वडिलांना सांगितली. आई वडिलांनी तरुणाच्या या कृत्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. १ मार्चला दुपारी १ वाजता मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठले. तरुणीने फोन कॉल करून प्रेमाच्या वाल्गना करणाऱ्या त्या तरुणाविरुद्ध पोलीस स्टेशनला रितसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत शंकर सुधाकर देऊळकर या आरोपीला अटक करून त्यावर भादंवि च्या कलम ३५४-ड (१)(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार विठ्ठल बुरेवार करीत आहे.