WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लोकनायक बापूजी अणे स्मृती व्याख्यानमालेचा सुवर्णमहोत्सव संपन्न....

Image

सागर मुने, वणी

वणीचे भूषणीभूत सुपुत्र, पद्मविभूषण माधव श्रीहरी उपाख्य लोकनायक बापूजी अणे यांच्या स्मृत्यर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेने यावर्षी अत्यंत समृद्धरीत्या आपला सुवर्णमहोत्सव संपन्न केला.

याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, उपाध्यक्ष रमेश अणे, सचिव लक्ष्मण भेदी, कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, प्रा. विजय वाघमारे तथा कु. पल्लवी भटारकर उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. खानझोडे यांनी व्याख्यानमालेच्या इतिहासा सोबत, लोकमान्य पगारदार सहकारी संस्थेतर्फे वंचित घटकांना अर्थसाहित्य करण्याच्या महाविद्यालयाच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा परिचय करून दिला.

लक्ष्मण भेदी यांनी महाविद्यालयातील घटकांद्वारे व्याख्यान देण्याची भूमिका स्पष्ट करून वक्त्यांचा परिचय करून दिला.

याप्रसंगी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. निलिमा दवणे यांच्या तीन पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.

कु.पल्लवी भटारकर या इतिहास विषयाच्या पदव्युत्तर वर्गातील सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनीने, परिस्थितीचा स्वीकार, मानसिकतेत सकारात्मकतेची स्थापना आणि नकारात्मक गोष्टी तथा व्यक्तींकडे दुर्लक्ष या तीन मुद्द्यांच्या आधारे,' सकारात्मक विचार - एक जादू 'असा आपला विषय प्रस्थापित केला.

'जागतिकीकरण आणि उपेक्षितांच्या समस्या' या आपल्या विषयाची स्थापना करतांना प्रा. विजय वाघमारे यांनी माझ्यासारख्या मराठीच्या अभ्यासकाला समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र शी संबंधित या विषयाला न्याय देणे अत्यंत कठीण आहे हे प्रांजळपणे कबूल करीत, मानवाच्या निर्मितीपासून जागतिकीकरण कायद्या पर्यंतचा इतिहास उलगडून दाखविला.

पूर्वी खऱ्या अर्थाने सर्वांसाठी मुक्त असणारे ज्ञानार्जन या बौद्धिक संपदा कायद्यानंतर सामान्यांच्या कक्षेबाहेर गेले आहे ही खंत व्यक्त करीत, ६७४८ मानवी जमाती अद्याप आम्हास अनोळखी आहेत हे भीषण वास्तव सांगत अशा विविध उपेक्षितांच्या जीवनावर जागतिकीकरणाच्या होणाऱ्या परिणामाची चर्चा केली.

बांगलादेशात स्त्रियांच्या नोकरीचे प्रमाण ५४.७ टक्के आहे तर भारतात ते २५ टक्के ही नाही. सरकार ज्यांना साक्षर म्हणते त्यापैकी १५ कोटी लोकांना वृत्तपत्र ही वाचता येत नाही इ. भीषणता त्यांनी अधोरेखित केली.

अध्यक्षीय समारोपात आपल्या संस्थेतील व्यक्ती बाहेर जाऊन देदिप्यमान कार्य करते तेव्हा आम्हाला कसा अभिमान वाटतो ते सांगत,या व्याख्यानामध्ये आपल्या लोकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका नरेंद्र नगरवाला यांनी स्पष्ट केली.

यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पदवीदान करण्यात आले.

महाविद्यालयाच्या अनेक दात्यांनी दिलेल्या ठेवीतून प्रत्येक वर्षी देण्यात येणाऱ्या तथा विद्यापीठ व अन्यत्र विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या विविध पारितोषिकांचे याप्रसंगी वितरण करण्यात आले.

पूर्वा काळे (कला), मीनाक्षी उराडे (वाणिज्य) आणि किरण केशवाणी (विज्ञान) या तीनही विद्यार्थिनींनी प्रत्येकी सात सात पारितोषिके पटकावली हे विशेष उल्लेखनीय.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे तर आभार प्रदर्शन डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share