वर्धा नदीत उडी घेतल्याचा संशय असलेल्या उकणी येथील युवकाचा शोध घेण्याकरिता बोट उपलब्ध करून देण्याची मागणी !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
पाटाळा पुलावरून वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय असलेल्या उकणी येथील युवकाचा शोध घेण्याकरिता बोट उपलब्ध करून देण्याबाबत निर्भीड ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
उकणी येथील २३ वर्षीय तरुणाने १७ सप्टेंबरला रात्री ७ वाजताच्या दरम्यान पाटाळा पुलावरून वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा नातेवाईकांना संशय असून तशी नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा नोंदविली आहे. ईश्वर शिवशंकर शुक्ला असे या युवकाचे नाव असून त्याची दुचाकी व मोबाईल नदीच्या पुलावर आढळून आल्याने त्याने नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय बळावत आहे. त्याचा अजूनही थांगपत्ता लागला नसून त्याला नदी पात्रात शोधण्याकरिता बोट उपलब्ध करून देण्याची विनंती उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
त्याचे कुटुंब व नातेवाईक मागील पाच दिवसांपासून नदी काठांवर त्याचा शोध घेत आहे. दूरपर्यंत नदी काठांवर त्याचा शोध घेऊनही तो आढळून आला नाही व इतरत्रही त्याच्या बद्दल काही माहिती मिळाली नाही. त्याकरिता त्याचे लवकरात लवकर शोधकार्य करण्यास संबंधित पोलीस यंत्रणेला सूचना देऊन आपत्ती व्यवस्थापन निवारण कक्षामार्फत तत्काळ या युवकाला शोधण्याकरिता बोट उपलब्ध करून देण्याची विनंतीही निर्भीड ग्रामीण पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनातून केली आहे. तसेच पाच दिवसांपासून त्याचा शोध न लागल्याने नातेवाईक चिंतातुर झाले असून गावकरीही कमालीचे चिडले आहेत. वडिलांचे छत्र हरपल्यापासून आईने लोकांच्या घरची धुनी भांडी करून त्याचे पालन पोषण केले. आता तरुण वयात आईचा आधार बनण्याऐवजी तो असा काही लापता झाला आहे की, पाच दिवस लोटले तरी त्याचा शोध लागता लागत नाही. त्यामुळे प्रशासनाने त्याच्या शोधकार्यात सहकार्य करून त्याचा लवकरात लवकर शोध घेण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देऊन त्यांना शोध घेण्याकरिता बोट उपलब्ध करून देण्याची विनंती वजा मागणी निर्भीड ग्रामीण पत्रकार संघाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.