WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रा. भेदोडकर यांच्या दोन काव्य संग्रहाचे प्रकाशन

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

येथील विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष व लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक गुलाबराव भेदोडकर यांच्या उष:काल व सांगाती या दोन काव्य संग्रहाचे प्रकाशन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या वर्धापन दिनी दि.14 जानेवारीला जैताई मंदिरात आयोजित कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.

या दोन काव्य संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, डॉ. अरविंद भुरे, नरेंद्र नगरवाला, माधव सरपटवार हे होते. व्यासपीठावर या काव्यसंग्रहातावर भाष्य करणारे डॉ. दिलीप अलोणे, डॉ. स्वानंद पुंड व उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माधव सरपटवार यांनी या शाखेच्या इतिहास मांडला. पूर्ण विदर्भातून तालुका स्तरावर पुस्तक प्रकाशनाचे काम फक्त वणी शाखेतर्फे घेतल्या जाते. आतापर्यंत 16 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा.गुलाब भेदोडकर रचित प्रणिता पुंड, रेणुका अणे, अपर्णा देशपांडे यांनी सादर केलेल्या दत्त वंदनेने झाली. त्यानंतर उष्ण:काल व सांगाती या दोन काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर बोलतांना अपराजित म्हणाले की, प्रा. भेदोडकर म्हणजे विनम्रतेचा पुतळा आहे. त्यांनी लिहिलेल्या कविता वाचतांना बा.भ. बोरकरांची आठवण येते. पोहता येण्यापेक्षा डुबता आल्याशिवाय भावार्थ कळत नाही. त्यांच्या कवितेचा मापदंड तोलामोलाचा आहे. कवितेत रसाळ भाव आहे. वयाच्या 13 व्या वर्षांपासून 70 व्या वर्षापर्यंत त्यांचे कवितेचे लिखाण हे सतत प्रवाहित होते ही खूप मोठी बाब आहे. सांगाती या कविता संग्रहातील कविता या त्यांच्या आयुष्यातील पूर्वार्धात रचलेल्या आहेत, तर उष:कालहा संग्रह उत्तरार्धात आहे.

या कविता संग्रहावर भाष्य करतांना प्रा.डॉ

स्वानंद पुंड म्हणाले की, प्रा. भेदोडकरांचा काव्यसंग्रह हा फक्त वाचण्यासाठी नाही. त्यांच्या कविता या सकारात्मकतेची पेरणी करणाऱ्या आहेत. वाईटात चांगलं शोधण्याची प्रवृत्ती कवींच्या कवितेत दिसते. विवेकवाद असणाऱ्या या कविता नैतिकतेची शुचिता राखणाऱ्या आहेत. त्यानंतर बोलतांना डॉ. अलोणे म्हणाले की, प्रा. भेदोडकरांच कवितेवर नि:स्सीम प्रेम आहे. त्यांच्या भाबडेपणातुन कविता आकारास आल्या. त्यांच्या कविता त्यांच्यासाठी आनंद, सुख दुःख, जाण, प्राण, सखी सोबती सांगाती आहेत. हे या कविता संग्रहातून ये सांगतात. अनुभवांच्या जाणीवेतून त्यांच्या कवितांचे प्रगटीकरण झाले आहे. जीवनाचे शाश्वत सूत्र त्यांच्या कवितेत सापडते.

प्रमुख अतिथी म्हणून आ. बोदकुरवार व नरेंद्र नगरवाला यांची समयोचित भाषणे झाली. या कविता संग्रहाच्या प्रकाशन सामारंभा प्रसंगी कविवर्य गुलाब भेदोडकर आपल्या भावना व्यक्त करतात म्हणाले की, माणुसकी, न्याय, नीती, धर्म यांचे संस्कार माझ्या आईकडून माझ्यावर झाले. त्यामुळे ही मुळ तत्वे माझ्या कवितेत उतरली आहेत. माणूस चंद्रावर पोहोचला पण सोबत राहणाऱ्या माणसातला माणूस त्याला दिसत नाही. तो शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजात असलेले सामाजिक नैराश्य पाहून मला कविता स्फुरत होत्या. समाजच दर्शन व त्यातील व्यथा कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्षीय समारोप करतांना सदाशिवराव ठाकरे म्हणाले की, पैशापेक्षा प्रेम महत्वाचे आहे. पैशापेक्षा माणसांनी माणसं कमवावीत. शिक्षणा सोबत चारित्र्य संपन्नता ही काळाची गरज आहे. कुटुंब, नातेवाईक, मित्रांना जवळ घेऊन समाजाने जगावे असा संदेश या कवितेतून मिळते. असे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजित अणे व राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले. आभार गजानन कासावार यांनी मानले. या कार्यक्रमात पूर्ण भेदोडकर परिवार सहभागी झाला होता.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share